दीड महिन्यानंतर लांब पल्ल्यावरही धावू लागल्या एसटी बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:17+5:302021-06-10T04:10:17+5:30
अमरावती : कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस फेऱ्यांवर लागू करण्यात आलेले निर्बध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात ...
अमरावती : कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस फेऱ्यांवर लागू करण्यात आलेले निर्बध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. मागील दीड महिन्यापासून बंद असलेल्या औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर, धुळे या लांब पल्ल्याच्या गाड्या सोमवारपासून सुरू झाल्या आहेत.
शासनाच्या निर्णयानुसार सोमवारपासून शंभर टक्के प्रवासी क्षमतेने बसफेऱ्यांना सुरुवात झाली. त्यापूर्वी ५० टक्के क्षमतेने मर्यादित स्वरूपात बसफेऱ्या सुरू होत्या. त्याप्रमाणे फक्त कोरोनासंबंधित आवश्यक कामासाठी जाणाऱ्यांनाच एसटी बसगाड्यांनी प्रवास करता येत होता. आता मात्र सर्वांसाठी एसटीचा प्रवास खुला झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाने विदर्भातील बहुतांश शहरांसाठी अमरावतीतून फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यानंतर औरंगाबादकरिता सकाळी ७ व ९ वाजता, परभणी सकाळी ७ वाजता, नांदेड दुपारी १२.३० वाजता, लातूर सकाळी ८.३० वाजता व नागपूर दर अर्ध्या तासाने बस सोडली जात आहे. अशा प्रकारे अमरावती विभागातून लांब पल्ल्याच्या शहरासाठी फेऱ्या केव्हा सुरू होणार, अशी विचारणा प्रवाशांकडून केली जात होती. यामुळे ६ जूनपासून या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या असल्याचे मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक संदीप खवडे यांनी सांगितले.
कोट
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून येत्या एक-दोन दिवसात पुणे आणि जळगावसाठीही बसफेरी सुरू केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून बसेस सोडल्या जात आहेत.
श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रक