रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडूंनी आपली भूमिका केली स्पष्ट, म्हणाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 03:16 PM2022-11-01T15:16:53+5:302022-11-01T15:19:36+5:30
बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं
अमरावती : गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील दोन नेते आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यात राजकीय युद्ध सुरू होते. एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडला. कडू यांच्याविषयी केलेल्या विधानांबद्दल राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर, आज प्रहारच्या कार्यकारी मेळाव्यात बच्चू कडू आपली भूमिका स्पष्ट करणार होते. याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.
बच्चू कडू यांनी मेळाव्यात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. पहिली वेळ म्हणून माफ केलं, परंतु, यापुढे आमच्या वाटेला गेल्यास माफ करणार नाही, असे कडू म्हणाले. यासह सहन झालं नाही तर सोडून जाऊ पण सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी कुणाचे नाव न घेता दिला. प्रहार हा काही आंडूपाडूंचा पक्ष नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेलो तर कोथळा काढतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. आजचा कार्यक्रम शक्तीप्रदर्शन नाही. इथल्या गर्दीत सगळे दर्दी आहेत, असेही ते म्हणाले.
आज अमरावतीच्या नेहरू मैदानात प्रहार संघटनेचा कार्यकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी राज्यभरातून प्रहारचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले. दरम्यान, मेळाव्याच्या ठिकाणी 'मै झुकेगा नही'च्या पोस्टरनी चर्चांना उधाण आलं. प्रहार इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे. आज प्रहार उभी असले तर ती फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभी आहे, असे कडू म्हणाले. जिथं दु:ख, वेदना असेल तिथे नातं निर्माण करा, असे आवाहन बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना केलं.
महाराषट्रातील एकही कोपरा सोडला नाही.
लोकांसाठी काम करताना संपूर्ण राज्यभर दौरे केले, एकही कोपरा सोडला नाही. राजकारणासाठी दिव्यांगाचा वापर केला नाही. ज्याला डोळे नाही त्यांचे डोळे होता येईल का, ज्यांना पाय नाही त्यांचे आधार होता येईल का यासाठी कार्य केलं. राजकारणासाठी त्यांचा वापर कधीच केला नाही, असेही कडू म्हणाले.
गरिबांच कार्ट अन् मोठ्यांचा साहेब
आज सगळ्या पक्षात बंडखोर आहेत आणि जे बंडखोर आहेत तेच पहिला रांगेत आहेत. निर्णय कडू असले तरी काम गोड व्हायला हवं, असं कडू म्हणाले. यासोबतचं गरिबांच ते कार्ट अन् मोठ्यांचा तो साहेब असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला.