-तर आमदारकीचा राजीनामा देईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:15 PM2017-11-12T23:15:37+5:302017-11-12T23:16:19+5:30
स्थानिक संजय गांधीनगर हे वनजमिनीवर वसले असले तरी त्या मोबदल्यात वनविभागाला दुसरी जमीन दिली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक संजय गांधीनगर हे वनजमिनीवर वसले असले तरी त्या मोबदल्यात वनविभागाला दुसरी जमीन दिली जाईल. किंबहुना एकाही घराला धक्का लागल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन, अशी ग्वाही आमदार रवि राणा यांनी दिली.
संजय गांधीनगरवासीयांना वनविभागाने घरे हटविण्यासाठी नोटिसा बजावल्याच्या पार्श्वभूमीवर आ. रवि राणा यांनी रविवारी बैठक घेतली. यावेळी आ. राणा यांनी संजय गांधीनगर परिसरात हजारो नागरिकांसमक्ष शपथ घेताना संजय गांधीनगरातील एकाही घराला धक्का लागला तर आमदारपदाचा राजीनामा देईन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार वनविभागाच्या जमिनीवरील एकही घरे हटणार नाही, असा शब्द त्यांनी दिल्याचे आमदार रवि राणा यांनी यावेळी नागरिकांना सांगितले. नोटीस बजावणे हे प्रशासनाचे कर्तव्यच आहे. मात्र, यात काहीही तथ्य नाही.
कायमस्वरुपी घरे मिळवून देऊ
संजय गांधीनगराबाबत मी स्वत: दक्ष असून एकाही घराला धक्का लागू देणार नाही. एवढेच नव्हे, तर संजय गांधीनगरवासीयांना कायमस्वरूपी मालकी हक्क मिळवून देणार, अशी हमी आ. रवि राणांनी दिली. संजय गांधीनगरवासीयांचा अतिक्रमणाचा प्रश्न यापूर्वीच शासनस्तरावर मांडण्यात आला आहे. वनविभागाच्या जागेत हे नगर वसले असून त्यांना हटविणे शक्य नसल्याने वनविभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने होकारही दर्शविला आहे. याबाबत लवकरच शिक्कामोर्तब केले जाईल, असा विश्वास आमदार राणा यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील याबाबत सकारात्मक असून लवकरच या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी नगरसेवक ऋषि खत्री, माला देवकर, विधी सभापती सुमती ढोके, आशिष गावंडे, सपना ठाकूर, माजी नगरसेवक मंगेश मनोहरे आदी उपस्थित होते.