पेरण्या झाल्या, वीजपुरवठा अखंडित ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:49+5:302021-08-01T04:12:49+5:30
अमरावती : जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोविडकाळात आधीच विविध क्षेत्रांचे नुकसान झाले. आता ...
अमरावती : जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोविडकाळात आधीच विविध क्षेत्रांचे नुकसान झाले. आता खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. अशा काळात वीजपुरवठा खंडित करून शेतकरी बांधव, नागरिकांची गैरसोय होता कामा नये. जिल्ह्यात सर्व ठिकाणी वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे निर्देश महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले.
महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे व महावितरणचे विविध अधिकारी उपस्थित होते.
बिल न भरल्याचे, तसेच इतरही अनेक कारणे दाखवून वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. वास्तविकत: कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले. त्यामुळे याबाबत संयमाने व संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. नागरिकांची परिस्थिती जाणून टप्प्याटप्प्याने रक्कम वसूल करता येणे शक्य आहे. त्याबाबत शासनाच्याही सूचना आहेत. दुरुस्ती किंवा अन्य कारणासाठी वीजपुरवठ्यात काही काळ कपात होत असेल तर त्याचे वेळापत्रक जाहीर केले पाहिजे. याची कल्पना नागरिकांना दिल्यास त्यांची गैरसोय टळेल, असे पालकमंत्री म्हणाल्या. महावितरणला उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत ५० कोटी व जिल्हा नियोजनांतर्गत १५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. याअंतर्गत सावळापूर, बेलोरा उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, आष्टीचे कामकाज प्रगतिपथावर आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात ३३/११ केव्ही राजुरा उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. उर्वरित कामांनाही गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.