वादळी पावसानंतर वारूळातून बाहेर पडताहेत साप
By admin | Published: May 30, 2017 12:11 AM2017-05-30T00:11:19+5:302017-05-30T00:11:19+5:30
गत दोन दिवसांपासून वादळ, वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्याच्या धर्तीवर वारूळातून साप बाहेर पडण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
दोन दिवसांत १५ साप आढळलेत : वडाळी जंगलात साप सोडल्याची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गत दोन दिवसांपासून वादळ, वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्याच्या धर्तीवर वारूळातून साप बाहेर पडण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दोन दिवसांत एक, दोन नव्हे, तर चक्क १५ साप सर्पमित्रांनी पकडून ते वडाळी- पोहरा जंगलात सोडल्याची नोंद वनविभागात करण्यात आली आहे. त्यामुळे घरात अथवा परिसरात साप निघाल्यास वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळा सुुरू झाला की, घरी किंवा नागरी वस्त्यांमध्ये साप निघाल्याच्या घटना निदर्शनास येतात. मात्र यंदा वादळी पाऊस येताच मोठ्या प्रमाणात वारूळातून साप बाहेर येण्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. वारूळातून साप बाहेर पडल्यानंतर ते जंगलाशेजारील भागात आश्रयास येत असल्याचे दिसून आले आहे. बडनेरा ते कोडेंश्वर मार्गावरील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील एका डिक्कीत सोमवारी चक्क कोब्रा जातीचा साप होता. हा साप बघताच वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. बंद डिक्कीमध्ये नाग गेला कसा? याचे उत्तर अधिकाऱ्यांना कळू शकले नाही. डिक्कीतील बटन सुरु केल्याशिवाय वीज प्रवाह सुरुकरता येत नव्हते. परंतु डिक्कीत साप असल्याने तो बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्पमित्रांशी संपर्क साधून वीज उपकेंद्राच्या डिक्कीमध्ये भला मोठा साप असल्याची माहिती दिली. त्यानुसार सर्पमित्र नीलेश कंचनपुरे यांच्यासह ऋषिकेश देशमुख, अभिजित दाणी हे घटनास्थळी पोहचले. या सर्पमित्रांनी मोठ्या शिताफिने वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील डिक्कीत दबा धरून बसलेला कोब्रा जातीचा साप पकडून बाहेर काढले. या सापाला वडाळी जंगलात सोडण्यात सोमवारी सोडण्यात आले आहे. तसेच रविवारी रात्री जेवडनगर परिसरातून साप पकडण्यात आला आहे. गत दोन दिवसांपूर्वी मांढूळ (दुतोंड्या साप) आढळला असून या सापाला सुखरुप वडाळी- पोहरा जंगलात सोडण्यात आले आहे. जंगल शेजारील नागरी वस्त्यांमध्ये अक्षय तांबटकर, कुवर्चन श्रीवास या सर्पमित्रांनी वेगवेगळ्या जातीचे साप पकडून ते जंगलात सोडले आहे.
असे आढळले साप
गत दोन दिवसांत वारूळातून साप बाहेर पडल्यानंतर १५ साप जंगलात सोडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात ३ कोब्रा (नाग , एमआयडीसी दालमिल, बडनेरा वीज उपकेंद्र) ३ पांदीवळ (सरोज कॉलनी), १ ब्लॅक कवळ्या (महादेव खोरी), २ धामण (मंगलधाम कॉलनी), १ मांजऱ्या (जेवडनगर), २ तस्कर, २ कवळ्या, १ मांढूळ अशा प्रजातीच्या सापांचा असा समावेश आहे. हे साप जंगलात सोडल्याची नोंद वनरक्षक आर.एन. घोगरे यांच्याकडे केली आहे.
वनविभागाकडे अधिकृत सर्पमित्रांच्या नोंदी आहेत. नागरिकांकडे साप निघाल्यास ते पकडण्यासाठी सर्पमित्रांना पाठविले जाते. गत दोन दिवसांत विविध जातीचे १५ साप पकडण्यात आले असून ते वडाळी जंगलात सुखरुप सोडल्याची नोंद आहे. साप निघाल्यास नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधावा.
- हरिश्चंद्र पडगव्हाणकर,
वनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी