सलाइन-इंजेक्शननंतर शरीर काळेकुट्ट पडले; मुलगी दगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 01:58 PM2023-10-20T13:58:13+5:302023-10-20T14:00:40+5:30
डॉक्टरांचा हलगर्जीपणा : नातेवाइकांचा आरोप
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भरती असलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. डॉक्टर आणि वॉर्ड क्र. १ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाला ‘ती’ बळी पडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार देत रुग्णालयात नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
प्राप्त माहितीनुसार रोशनी केशव तिडके (१७, रा. गोदेगाव, ता. दारव्हा, जि. यवतमाळ) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. रोशनीला ताप आल्याने तिला नातेवाइकांनी कारंजा येथे भरती केले होते. तेथून तिला बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे रेफर करण्यात आल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास तिला वॉर्ड क्र.१ मध्ये भरती करण्यात आले होते. या ठिकाणी तिला डॉक्टरांनी तीन सलाईन तसेच इंजेक्शनही देण्यात आले. परंतु रात्री तीन वाजल्यापासून अचानक तिचे पूर्ण शरीर काळे पडायला लागले.
यासंदर्भात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांना सांगूनही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच तिच्या संपूर्ण शरीराची आग होत होती. याची माहिती डॉक्टरांना देऊनही तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे आणि अखेर दुपारी तीन वाजता ‘रोशनी’चा मृत्यू झाला. तिच्या या मृत्यूला रुग्णालयातील डॉक्टर आणि संबंधित कर्मचारीच जबाबदार असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याचे सांगत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. याच वेळी आझाद समाज पक्षाचे काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही रुग्णालयात जाऊन आंदोलन करत कारवाईची मागणी केली. सायंकाळी सातपर्यंत नातेवाइकांचे आंदोलन सुरूच होते.
दोन डॉक्टरांसह पाच जणांना नोटीस
रोशनी तिडके मृत्यूननंतर रुग्णालय प्रशासनाने वार्ड क्र. एकमध्ये रोशनीवर उपचार करणाऱ्या डॉ. तृप्ती जवादे, डॉ. अनुजा शिरभाते, अधिपरीचारीका रिना दौंड, प्रतिमा रौराळे आणि वार्डातील कक्ष सेवक दाऊ सारवान यांना नोटीस देत मृत्यू संदर्भातील खुलासा मागण्यात आला आहे. २४ तासात खुलासा न दिल्यास कारवाई करण्याचा इशाराही रुग्णालय प्रशासनाने दिला आहे.
...हे आमचे काम नाही
रोशनीची प्रकृती गंभीर होत असतानाही तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले नाही. तसेच तिचे शरीर काळे पडत असल्याने नातेवाइकांनी रक्त तपासण्याची विनवणी वॉर्डातील परिचारिकांकडे केली. परंतु त्यांनी हे काम आमचे नसल्याचे सांगत नातेवाइकांना हटकले. तसेच जर आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त समजत असेल तर आमच्या खुर्च्यांवर तुम्ही बसा अशा प्रकारचे उद्धटपणे वागणूकही दिल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
रोशनी तिडकेचा मृत्यू हा हलगर्जीपणाने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्याअनुषंगाने संबंधित डॉक्टर, अधिपरीचारीका यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- डॉ. प्रमोद निरवणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रोशनीचा मृत्यू झाला. यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून आंदोनल केले. संबंधितांवर कारवाईचे रुग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासना दिले आहे. इन कॅमेरा शवविच्छेदन व्हावे.
- मनीष साठे, आझाद समाज पार्टी