अंजनगाव तालुक्यातील चोरीनंतर आता केळीचे घड लंपास करण्याचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:49+5:302021-09-02T04:27:49+5:30
काही दिवसांपूर्वी देवगिरेनगरमध्ये राहणारे रामेश्वर ठाकरे व बालाजीनगरमधील वासुदेव जायले यांच्या घरी चोरांनी दिवसाढवळ्या कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे ...
काही दिवसांपूर्वी देवगिरेनगरमध्ये राहणारे रामेश्वर ठाकरे व बालाजीनगरमधील वासुदेव जायले यांच्या घरी चोरांनी दिवसाढवळ्या कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. त्याअगोदर दोन दिवसांपूर्वीच टाकरखेड मार्गाने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. यानंतर २० ऑगस्ट रोजी न्यायालयाजवळील मोहमदियानगरात रात्री ८ ते १० वाजताच्या सुमारास चोरांनी ५ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. एवढेच नव्हे तर आता चोरांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केलेल्या पिकाकडे वळला आहे. विशेषत: केळीचे घड चोरून नेले जात आहे. खोडगाव रस्त्यावरील किशोर धुळे, दीपक धर्मे, नरेश अस्वार यांच्या शेतातील ऐन काढणीला आलेले केळीचे घड अज्ञात व्यक्तीने चोरून नेले व काही घड जागेवरच टाकून दिले. यामुळे शहराबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे.
देवगिरेनगर येथील रामेश्वर ठाकरे यांच्या पत्नी व सून खरेदीसाठी बाजारात व स्वतः रामेश्वर ठाकरे हे शेतात गेल्याचे पाहून अंदाजे दोन-अडीच वाजता चोरांनी दाराचे कुलूप तोडले व कपाटातील लाॕॅकरमध्ये ठेवलेले सोन्याचे ४३ ग्रॅमचे आभूषण आणि रोख ५४ हजार रुपये लंपास केली. दुसऱ्या एका घटनेत वासुदेव जायले (रा. बालाजी प्लाॕॅट) हे पती-पत्नी शिक्षक शाळेवर आणि मुलगा काही कामानिमित्त बाहेर गेल्याचे हेरून चोरांनी घर फोडून ५० ग्रॕॅमचे मंगळसूत्र व रोख पाच हजार रुपये असा अंदाजे २ लक्ष ८५ हजार रुपयाचा माल लंपास केला. ही घटना थोड्याच अंतराने झाल्याने चोरी करणारी टोळी पाळत ठेवूनच होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चोऱ्यांचे हे सत्र थांबविण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.