तीन तासांच्या चौकशीनंतर आमदार देशमुख म्हणतात, 'झुकेगा नही..!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 05:46 PM2023-01-17T17:46:35+5:302023-01-17T17:49:38+5:30
एसीबीसमोर शिवसैनिकांचा ठिय्या : चार तास रंगला हायव्होल्टेज ड्रामा
अमरावती : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्र कार्यालयात बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची सलग तीन तास चौकशी चालली. मंगळवारी दुपारी १२:३२ च्या सुमारास एसीबीत गेलेले आ. देशमुख ३:३० च्या सुमारास बाहेर पडले. त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया ‘झुकेगा नही..! अशी होती. सरकारच्या, भाजपच्या दडपशाहीला आपण भीक घालणार नाही, चौकशीला सामोरे जाऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मंगळवारी दुपारी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’, ‘ईडी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके, वर पाय’, अशा घोषणादेखील देण्यात आल्या. प्रसंग होता, बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या एसीबी चौकशीचा. गुवाहाटीतूनच शिंदे गटातून माघार घेतलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना अमरावती एसीबी कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आली होती.
अवैध मालमत्तेची चौकशी करण्यासाठी अमरावती येथील एसीबी कार्यालयात १७ जानेवारी रोजी हजर राहून जबाब नोंदविण्याचे आदेश नोटिशीत देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारी १२:३२ च्या सुमारास आ. नितीन देशमुख हे चौकशीसाठी दाखल झाले. तत्पुर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण कुठल्याही चौकशीस, प्रसंगी जेलमध्ये जाण्यास तयार आहोत, कुणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, असे सांगितल्याने उपस्थित शिवसैनिकांमधून प्रचंड घोषणाबाजी झाली. अमरावती व अकोल्यातील शिवसैनिकांची संख्या पाहता फ्रेजरपुरा व गाडगेनगर पोलिसांनी एसीबी कार्यालयासमोरच्या रस्त्यावर दुतर्फा बॅरिकेटिंग केली. वाहतूक थांबविण्यात आली होती.
बॅरिकेट्सच्या आतमध्ये शिवसेनेचे शंभरावर पदाधिकारी असल्याने बॅरिकेट्सबाहेर थांबवून ठेवलेले शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले होते. त्यांनी आम्हालाही आमच्या सहकारी शिवसैनिकांजवळ जाऊ देण्याची आग्रही मागणी केली. ती नाकारण्यात आल्याने बॅरिकेट्सबाहेर असलेल्या शिवसैनिकांचा पोलिसांशी शाब्दिक वाद झाला, तर दुसरीकडे आ. देशमुख एसीबी कार्यालयात असताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख सूर्यवंशी, सहसंपर्कप्रमुख प्रवीण हरमकर, जिल्हाप्रमुख सुनील खराटे व श्याम देशमुख, भारत चौधरी, राहुल माटोडे, पंजाबराव तायवाडे, आशिष धर्माळे, सागर देशमुख, दिगंबर मानकर यांच्यासह अकोला, बाळापुरातून आलेल्या शिवसैनिकांनी सुमारे तासभर बाहेर ठिय्या आंदोलन केले.
एसीबीला छावणीचे स्वरूप
आ. देशमुख हे एसीबी कार्यालयात येणार म्हणून गाडगेनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, ११:३० नंतर हळूहळू शिवसैनिक एकत्र येऊ लागल्याने व घोषणाबाजी सुरू झाल्याने पोलिस यंत्रणा अधिक सजग झाली. एका शिवसैनिकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने दूरवर असलेल्या शिवसैनिकांनी एसीबी कार्यालयासमोर असलेल्या अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर धाव घेतली. परिस्थिती चिघळू नये म्हणून काही शिवसैनिकांना तेथेच असलेल्या पोलिस वाहनात बसविण्यात आले. १२:३० च्या सुमारास आ. देशमुख स्थानिक शिवसैनिकांच्या गराड्यात एसीबी कार्यालयात पोहोचले. गर्दी पाहता एसीबीच्या गेटसमोरदेखील ‘खाकी’ तैनात करण्यात आली.
डीसीपी, एसीपी एसीबी कार्यालयाबाहेर
आक्रमक घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांमळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी १२ च्या सुमारास एसीबी कार्यालय गाठले. सहायक पोलिस आयुक्त पूनम पाटील यांनी सुमारे चार ते साडेचार तास एसीबी कार्यालयाबाहेर थांबून यंत्रणेला दिशानिर्देश दिले. गाडगेनगरच्या प्रभारी ठाणेदार रेखा लोंढे, फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव, वाहतूक निरीक्षक राहुल आठवले व संजय अढाऊ यांनी एकूणच परिस्थिती सांभाळली.