अनलॉकनंतर भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:55+5:302021-06-22T04:09:55+5:30
असाईनमेंट फोटो पी २१ बडनेरा श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बऱ्यापैकी सुटका मिळाल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया राबविणे सुरू ...
असाईनमेंट फोटो पी २१ बडनेरा
श्यामकांत सहस्त्रभोजने
बडनेरा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बऱ्यापैकी सुटका मिळाल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया राबविणे सुरू झाले. मात्र, लागलीच भाजीपाल्याच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा अधिकचा भार गृहिणीसह कुटुंबप्रमुखांना झेलावा लागत आहे. त्यामुळे घराघरांतील आर्थिक बजेट कोलमडले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जवळपास तीन महिन्यांचा कालावधी घेतला. यावेळी रुग्ण व मृत्युसंख्या मागील लाटेच्या तुलनेत अधिक होती. यामुळे लोक धास्तावले होते. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले होते. सर्वांनाच आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले. मात्र, एक महिन्यापूर्वी कोरोनापासून बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. एक जूनपासून शासन-प्रशासन स्तरावर अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर मात्र अचानक अवघ्या काही दिवसांत भाजीपाल्याच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने मोठा लोकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अनलॉकनंतर भाजीपाल्याचे एवढे दर का वाढले, यामागे सततचा पाऊस, बदलीचे वातावरण, डिझेल ,पेट्रोलच्या भावात झालेली प्रचंड वाढ, भाजीपाल्याच्या उत्पादनात घट अशी विविध कारणे पुढे येत आहेत. भाजीपाला महत्त्वाचा घटक आहे. त्याशिवाय जेवणाला स्वादच नाही.
--------------------------------
प्रतिक्रिया
* शेतकऱ्यांच्या पदरी निराशा -
1) सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहेत. लागवड कमी झाली आहे. भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच आहे.
- अनिल सरोदे, शेतकरी.
2) अनलॉकच्या आधी व नंतरदेखील भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था एकसमान आहे पावसामुळे हिरव्या पालेभाज्या सडत आहेत. शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनापासून फारसा मोबदला मिळत नाही.
- राजू पांडे, शेतकरी.
-------------------------------
प्रतिक्रिया
म्हणून वाढले दर -
1) डिझेल व पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम मालवाहतुकीच्या भाडेवाढीवर झाला आहे त्याचप्रमाणे कमी-अधिक पाऊस भाजीपाला खराब होण्यास सध्या कारणीभूत ठरत आहे. आर्थिक फटका सर्वांनाच आहे.
- सुभाष दारोकार, विक्रेता
2) अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे भाजीपाला सडतो. आर्थिक फटका सहन करावा लागतो. आवकदेखील कमी झाली आहे.
- अंकुश लांडोरे, विक्रेता
-----------------------------
प्रतिक्रिया
* परवडणाऱ्या भाज्यांवर भर
1) गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहे त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे विविध पदार्थांपासून चवदार भाज्या बनविण्याकडे माझा कल आहे. भाज्यांचे दर कमी झाले पाहिजे.
- जयश्री संजय गुरमाळे, गृहिणी.
2) अनलॉकनंतर अचानक भाजीपाल्याचे दर वाढल्याने त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागते आहे महागड्या भाज्या बाजूला ठेवून आम्ही परवडणाऱ्या तसेच घरगुती तयार केलेल्या पदार्थांपासून भाज्या बनवितो आहे.
- कल्पना निंबाळकर, गृहिणी.
-------------------------------
* भाजीपाल्याचे दर रु. (प्रति किलो)
अनलॉकच्या आधी / नंतर
1) फूलकोबी ५०-३०
2) भेंडी ६०-३०
3) पालक ३०-१५
4) कांदा ३०-२०
5) टोमॅटो २०-१५
6) मिरची ८०-४०
7) लसूण १६०-१२०
8) काकडी ४०-२०
9) वांगे ४०-२०
------------------------------