उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातील कारागृहांवर ड्रोनद्वारे सुरक्षा

By गणेश वासनिक | Published: April 18, 2023 05:29 PM2023-04-18T17:29:25+5:302023-04-18T17:29:42+5:30

कारागृहाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने निर्णय, व्हिडीओ कॅमेऱ्याचाही होणार वापर

After Uttar Pradesh, now security through drones at prisons in Maharashtra | उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातील कारागृहांवर ड्रोनद्वारे सुरक्षा

उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातील कारागृहांवर ड्रोनद्वारे सुरक्षा

googlenewsNext

अमरावती : राज्याच्या कारागृहात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने ड्रोन, व्हिडीओ कॅमेऱ्यांनी नजर असणार आहे. देशात यापूर्वी उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रात कारागृहांच्या सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेरा वापरला जाणार आहे. मंगळवारी पुणे येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण केंद्रात मोजक्याच कारागृह कर्मचाऱ्यांना ड्रोन, व्हिडीओ कॅमेरा हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अपर पोलिस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या पुढाकाराने राज्याच्या कारागृह विभागात मनुष्यबळाचा तुटवडा, अद्ययावतीकरण, सुसज्ज सुरक्षा यंत्रणा, कर्मचारी निवासस्थानांचा प्रश्न आणि बंदीजनांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जात आहे. राज्यात बहुतांश कारागृहे ही ब्रिटिशकालीन निर्मित आहेत. आता या भागात नागरी वस्त्यांची वाढ झाल्याने कारागृहांच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही कारागृहे राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत असल्यामुळे कारागृहात काय सुरू आहे, हे रस्त्यावरून सहजतेने दिसून येते.

कारागृहांच्या तटाभाेवती बंदूकधारी सुरक्षा रक्षकाची गस्त असते. एवढेच नव्हे तर कारागृहाच्या तटालगत ‘वॉच’ टॉवरही आहेत. मात्र, कारागृहांच्या पाषाण भिंती, पोलादी सुरक्षा भेदून कैद्यांना आतमध्ये मोबाइल, गांजा, चरस, दारू, गुटखा पोहोचत असल्याने हा विषय संशोधनाचा ठरत आहे. कर्मचारी सपोर्टशिवाय हे शक्य नाही, हेही तितकेच खरे आहे. परिणामी, आता कारागृहात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी २४ तास ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर असणार आहे. गतवर्षी जून महिन्यात अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेल ब्रेक झाले होते.

नागपूर मध्यवर्ती कारागृहातही टोळी युद्धाचा भडका उडाला होता. मुंबई, ठाणे कारागृहात विदेशी कैद्यांचा भरणा आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात नक्षलवादी मोठ्या संख्येने बंदिस्त आहेत. एकंदरीत कारागृहांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे आता ड्रोनद्वारे सुरक्षा केली जाणार आहे. यासंदर्भात कारागृह प्रशासनाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

नऊ मध्यवर्ती कारागृहांना ड्रोनद्वारे सुरक्षेला प्राधान्य

मुंबईचे ऑर्थर रोड, पुण्याचे येरवडा, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, तळोजा, अमरावती व नागपूर या नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये सुुरक्षेसाठी ड्रोन, व्हिडिओ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे तसेच कल्याण, चंद्रपूर जिल्हा कारागृहासह अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील खुले कारागृहातही ड्रोनद्वारे सुरक्षा केली जाणार आहे. मध्यवर्ती कारागृहातील चार तर, जिल्हा कारागृहातील तीन असे कर्मचारी ड्रोन हाताळणीचे प्रशिक्षण घेणार आहेत.

विदेशी, नक्षलवादी, मोक्का कैद्यांवर विशेष लक्ष

राज्याच्या मध्यवर्ती कारागृहांमध्ये प्रसिद्ध खून खटल्यातील आरोपी, विदेशी कैदी, नक्षलवादी, मोक्का, जन्मठेप, एमपीडीए, एनडीपीएस अशा विविध आरोपांतील कैदी बंदिस्त आहे. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहात ड्रोन कॅमेराचा वापर केला जाणार असून, विदेशी, नक्षलवादी, मोक्का कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे

Web Title: After Uttar Pradesh, now security through drones at prisons in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.