यात्रेनंतर बहिरम मंदिर परिसर बकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:10 PM2019-02-25T23:10:53+5:302019-02-25T23:11:17+5:30
विदर्भातील सुप्रसिध्द आणि दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रा २० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. दोन महिने रोज मटनाच्या हंडीचे बेत अनुभवणाऱ्या बहिरम यात्रा परिसरात तुर्तास घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : विदर्भातील सुप्रसिध्द आणि दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रा २० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. दोन महिने रोज मटनाच्या हंडीचे बेत अनुभवणाऱ्या बहिरम यात्रा परिसरात तुर्तास घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मंदिर परिसरासह नजिकच्या शेती व खुल्या जागांमध्ये शेकडो टन ओला व सुका कचरा विखुरलेल्या स्थितीत असल्याने हेच काय ते वैभवशाली बहिरम? असा प्रश्न भाविक उपस्थित करीत आहेत.
दरवर्षी २० डिसेंबर रोजी होमहवनाने बहिरम यात्रेस सुरुवात होत असते. दोन महिने लाखो भाविकांची वर्दळ असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. येथील चुलीवर हंडीत शिजविलेल्या मटनाची ख्याती औरच. मात्र, यात्रा संपल्यानंतर त्याच चुली कचरा झाल्या आहेत. त्या मातीची धूळ प्रदुषणात भर पाडणारी ठरली आहे. यात्रा संपल्यानंतर परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचले आहेत. स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. यात्रा व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष असून, ते ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत आहेत. कचºयाची विल्हेवाट लावण्याचे औदार्य त्यांनी दाखवलेले नाही.
प्लास्टिक बंदीचा फज्जा
यात्रेतील स्वच्छतागृहातील घाण तशीच पडून आहे. स्वच्छतागृहाची देखभाल व दुरूस्ती आणि दुर्दशा शब्दापलिकडची ठरली आहे. प्लास्टिक बंदीचा फज्जा कसा उडातोय, हे दर्शविणारी ही यात्रा राज्यात सर्वोत्तम उदाहरण ठरली आहे. यात्रेत सर्रास प्लास्टिकचा वापर करण्यात आला. ते प्लास्टिक, पिशव्या यात्रा परिसरात सर्वत्र विखुरल्या आहेत.
आरोग्य धोक्यात
यात्रेतील घाण, कचरा, घोंगावणाºया माशा गावांसह बहिरमचे ग्रामस्थ आणि यात्रेकरूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहेत.यात्रेच्या सुरूवातीला यात्रेत आढळून न येणाºया माशा यात्रा संपताना शेवटीच बघायला मिळतात. ही बाब इंग्रजांनी गॅझेटीयरमध्येही नोंदविली होती.