आगडोंब.... आक्रोश अन् आकांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:10 AM2019-05-20T01:10:13+5:302019-05-20T01:13:19+5:30
वलगाव स्थित बाजारपुऱ्यातील आगडोंब उडाल्याने ग्रामस्थांचा एकच आक्रोश, आकांत व आक्रमकता पाहायला मिळाली. अन्नधान्यांसह लाखोंची रोख, दागदागिने व घरगुती साहित्य, असे सर्वच आगीने विळख्यात घेतले. घामाघूम झालेल्या रहिवाशांच्या चेहºयावरील आक्रोश व आक्रमकता पाहून समाजमन सुन्न झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वलगाव स्थित बाजारपुऱ्यातील आगडोंब उडाल्याने ग्रामस्थांचा एकच आक्रोश, आकांत व आक्रमकता पाहायला मिळाली. अन्नधान्यांसह लाखोंची रोख, दागदागिने व घरगुती साहित्य, असे सर्वच आगीने विळख्यात घेतले. घामाघूम झालेल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावरील आक्रोश व आक्रमकता पाहून समाजमन सुन्न झाले.
आगीचे रौद्ररुप पाहून रहिवाशांना आपल्या घरातील मूलभूत साहित्यांसह मौल्यवान वस्तूदेखील वाचविता आले नाही. गॅस सिलिंडर, रोख, दागदागिने, अन्नधान्यांसह घरगुती साहित्य आगीत जळताना पाहून रहिवाशांनी आकांततांडव केला. महिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा, तर पुरुषांच्या चेहºयावर आक्रमकता दिसून आली. संसार उघड्यावर आल्याने नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. काही कुटुंबांत मुला-मुलींच्या लग्नाची, तर काहींच्या साक्षगंधाच्या सोहळ्याची तयारी सुरू असतानाच आगीचे हे मोठे विघ्न आले. हा थरार तेथील आगग्रस्त उघड्या डोळ्याने पाहत होते. परंतु ते कसे वाचविणार, प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे आयुष्यात कमावलेल्या पुंजीचे काय होणार, अशी भीती काहीकाळ निर्माण झाली. राखरांगोळी झालेल्या घरातील साहित्यांकडे पाहून अक्षरश: रहिवासी ओक्साबोक्सा रडत होते. कुटुंबातील सदस्य एकमेकांचे सांत्वन करीत जळालेल्या साहित्यांना न्याहाळत होते. बाजारपुºयातील ही भयावह स्थिती पाहून शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांचीही भंबेरी उडाली होती. आग लागल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
आजीचे किराणा दुकानही जळाले
पोटाची खळगी भरण्याकरिता पुनर्वसनासाठी परिसरात राहत असलेल्या कुटंबीयांकरिता प्रेमीका पंजाबराव करगेड या वृद्धाने किराणा दुकान थाटले होते. यावर तिच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत होता. अचानक आग लागल्याने आजीच्या दुकानातील एक लाखांचा किरणा जळून खाक झाला. हे सर्व उघड्या डोळ्याने पाहताना त्यांचे डोळे पणावले. आता जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता.
या कुटुंबीयांची जळाली घरे
आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या कुटुंबीयांमध्ये रामाजी दशरथ वानखडे, विनोद पंजाब खोरगडे, शाम जयराज सोळंके, निस्सार अली मुजफर अली, बाळू शिवरामजी आठवले, गणेश मारोती उगले, चंदू लक्ष्मण भगत, शिवदास काशीराम साबळे, माधव चंपत माहाखेडे, धर्मपाल मेश्राम व गंगुबाई मेश्राम, पंचफुला व्यंकटराव गडलिंग, रमेश रामकृष्ण गवई, अश्विन अशोक वानखडे, गणेश रामकृष्ण गवई, निर्मला किरण डोंगरे, कंचन रामदास नन्नावरे, प्रकाश नामदेव सिरसाट, मनोज साहेब वाघमारे, राजाराम गणेश चौधरी, गजानन देविदास तलवारे, नरेश दशरथ वानखडे, हिराचंद शेखर निचड, बाबाराव मारोती उगले, सैय्यद अब्दुल सैय्यद वकील, सिंदुबाई देविदास तलवारे, सुलोचना व्यकंटराव अवर, दिलीप प्रल्हाद मुंडे, लिलाबाई हरिदास गंडलिग, वच्छलाबाई प्रल्हाद मुंडे, वंदना जितेंद्र ऊर्फ मच्छिंद्र गडलिंग, शोभा देविदास डोंगरे, रचना विजय चोरपगारे, रामदास वामन गायकवाड यांचा समावेश आहे.
अन्नधान्यांसह लाखोंची रोख, दागिने आगीच्या भक्ष्यस्थानी
बाजारपुऱ्यातील ३७ कुटुंबीयांपैकी काहींनी घरातील रोख व दागदागिने वाचविण्यात यश मिळविले. मात्र, राजकन्या वानखडे यांच्या घरातील ६० हजारांची रोख, मुलीच्या साक्षगंधासाठी गोळा केलेले सोन्याचे दागिने जळाले. तसेच शहाना बानो इस्सार अली यांच्या घरातील लग्नाचे सोन्या-चांदीचे दागिने व भिसीचे दोन लाख रुपये आगीत खाक झाले. हीच स्थिती त्या ३७ कुटुंबातील अनेकांची आहे.