पुन्हा ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:11 PM2017-12-29T23:11:37+5:302017-12-29T23:12:30+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अभिनव योजना ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चे लोण पुन्हा पसरू लागले आहे.
आॅनलाईन लोकमत
तिवसा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अभिनव योजना ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चे लोण पुन्हा पसरू लागले आहे. काही दिवसांपूर्वी अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला होता. तरीही आता पुन्हा ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या बनावट योजनेच्या माध्यमातून नागरिक ांकडून पैसे जमा करणे सुरू झाले असल्याचे चित्र आहे.
नोंदणी फॉर्म भरण्यासाठी तिवसा तालुक्यासह जिल्हाभरातील टपाल कार्यालयात नागरिकांची झुंबड उडाली आहे. या योजनेतून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे सांगून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे. मात्र, अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचा खुलासा प्रशासनाच्यावतीने करण्यात आला. तरीही बºयाच झेरॉक्स सेंटरवर फॉर्म विक्री होत असून, त्यासाठी लागणारी इतर कागदपत्रेही झेरॉक्स करून देण्यात येत आहेत. हा फॉर्म टपाल करण्यापर्यंत एका व्यक्तीला जवळपास शंभर रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
अशी कोणतीही योजना नाही
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेच्या नावावर शेकडो ‘बोगस फॉर्म’ची विक्री होत आहे. या योजनेतून दोन लाख रुपये थेट अनुदान मिळणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, केंद्र सरकारची अशी योजना नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले. तरीही ग्रामीण भागात या योजनेंतर्गत विद्यार्थींसाठी दोन लाख रुपयांचा थेट लाभ मिळणार असल्याची बातमी जोरात परसत चालली आहे.
माहितीचा होईल दुरुपयोग
अर्जामध्ये विविध माहिती मागण्यात आलेली असून, त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आदी माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती भरून दिल्यास त्याचा दुरुपयोग होण्याची मोठी शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले. यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘प्रधानमंत्री बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेच्या नावावर सर्वसामान्य जनतेची होणारी लूट प्रशासनाने योग्य चौकशी करून तत्काळ थांबवावी. योजनेची योग्य माहिती जनतेपर्यंत पोहचवावी.
- अभिजित बोके, जिल्हा परिषद सदस्य
जानेवारी २०१५ मध्ये ’प्रधानमंत्री बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये वस्तुरुपात किंवा आर्थिक स्वरूपात मदत केली जात नाही. महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे फसवणुकीची तक्रार केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करू. - राम लंके, तहसीलदार, तिवसा