पुन्हा धडक शहर पोलीस आयुक्तालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:05 AM2018-07-19T00:05:18+5:302018-07-19T00:05:47+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यातिथीदिनी त्यांच्या अनुयायांनी पुन्हा पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना दिला. लहुजी शक्ती सेना, भीम आर्मी व मांतग समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यातिथीदिनी त्यांच्या अनुयायांनी पुन्हा पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना दिला. लहुजी शक्ती सेना, भीम आर्मी व मांतग समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
निवेदनानुसार, अण्णाभाऊ साठे व वीरांगणा राणी दुर्गावती यांचे पुतळे उभारण्यासाठी न्यायालये आणि शासन अनुकूल आहे, असे अण्णाभाऊ साठे पुतळा कृती समितीचे म्हणणे आहे. दोन्ही पुतळे उभारण्यासाठी कृती समितीने तयारी दाखविली. त्यासाठी चौथरा व पुतळा तयार करून देण्याची ग्वाही दिली. कृती समितीने नियोजित जागेवर कॉलम उभे केले. मात्र, गाडगेनगर ठाणेदार मनीष ठाकरे यांनी स्वत:हून गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन पुतळ्याच्या अनधिकृत बांधकामाबाबत माहिती मागविली. भीतीचे वातावरण निर्माण केले. मुख्याध्यापकांनी उत्तरादाखल पुतळ्यांचे बांधकाम प्रस्तावित असून, चौकशी करून कार्यवाही करावी, असे पत्र ठाणेदारांना दिले. ठाकरे यांनी चौकशी केली नाही. समाजबांधवांना विचारपूस केली नाही. १६ जुलैच्या पहाटे ५ वाजता दोन्ही पुतळ्यांसाठी बांधलेले पिलर तोडण्यात आले. ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केला असून, त्यांना तत्काळ निलंबीत करा आणि दोन्ही महापुरुषांचे पुतळे त्वरित उभारण्यास सहकार्य करा, असे कृती समितीने निवेदनात नमूद केले आहे. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे रूपेश खडसे, भिम आर्मीचे प्रदेश सचीव मनीष साठे, बंटी रामटेके, सुदाम बोरकर, सोशल फ्रन्टचे संस्थापक विजय गायकवाड, पंकज जाधव, देवानंद इंगोले, सुधाकर खडसे यांच्यासह अनेक अनुयायी उपस्थित होते.
गर्ल्स हायस्कूल चौकात अण्णाभाऊंची पुण्यतिथी शांततेत
लहुजी शक्ती सेना, भीम आर्मीकडून गर्ल्स हायस्कूल चौकात अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी शांततेत पार पडली. पोलीस बंदोबस्तात लोकशाहिरांच्या अनुयायांनी चौकातील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी ठाणेदार ठाकरे यांनी आक्षेप नोंदविल्याचा त्यांचा आरोप आहे.
ठाकरेंच्या निलंबनासाठी धरणे आंदोलनास सुरुवात
अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचा चौथरा तोडण्यास कारणीभूत असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेने गर्ल्स हायस्कूल चौकात उशिरा रात्री धरणे आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात लहुजी शक्ती सेनेचे पंकज जाधव यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाला माहितीस्तव उशिरा सायंकाळी अर्ज सादर केला. गाडगेनगर ठाणेदारांवर गंभीर आरोप करून निलंबन होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.