पुन्हा २४ कोरोनामुक्त; टाळ्या वाजवून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:00 AM2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:18+5:30
रविवारी १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. मंगळवार, १२ मे रोजी २५ रुग्ण कोविड रूग्णालयातून बरे झाले. त्यातील एका रुग्ण डायलिसीसवर असल्याने दक्षता म्हणून उपचारार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. या रूग्णासही लवकरच घरी सोडण्यात येईल, अशी माहिती आरोग्य यंत्रणने दिली. आतापर्यंत कोरोनावर मात करून ४५ जणांना सुखरूपणे घरी पाठविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोमवारी उशिरा रात्री पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद झाली असताना येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची आनंददायी बातमी समोर आली. कोविड रुग्णालयातून हे २४ जण बरे होऊन मंगळवारी दुपारी १२.३० वाजता घरी परतले. दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत.
रविवारी १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. मंगळवार, १२ मे रोजी २५ रुग्ण कोविड रूग्णालयातून बरे झाले. त्यातील एका रुग्ण डायलिसीसवर असल्याने दक्षता म्हणून उपचारार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. या रूग्णासही लवकरच घरी सोडण्यात येईल, अशी माहिती आरोग्य यंत्रणने दिली. आतापर्यंत कोरोनावर मात करून ४५ जणांना सुखरूपणे घरी पाठविण्यात आले आहे. कोविड रूग्णालयात उपचारानंतर सुखरुप घरी परत जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायी ठरली आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी उपस्थित होते. दरम्यान घरी पाठविण्यात आलेल्या २४ व्यक्तींना मिठाईचे वाटप करण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन, टाळ्या वाजवून आरोग्य यंत्रणेने बरे झालेल्या रूग्णांना अलविदा केले. घरी परतणाऱ्यांनी कोरोनापासून घाबरू नका, सावधगिरी बाळगा, आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन नागरिकांना केले. कोरोनाची लक्षणे असल्यास त्वरित रुग्णालयात उपचार घ्या, औषध घेतल्याने कोरोना बरा होतो, असा त्यांनी सल्ला दिला. कोविड रुग्णालयात गत १५ दिवसांपासून उपचार सुरु होता. एकूणच आरोग्य यंत्रणेने आम्हाला कुटुंबीयाप्रमाणे वागणूक दिली. विशेषत: परिचारिकांनी केलेली सुश्रूषा आमच्या जीवनात अवस्मरणीय राहील, अशी भावना महिला रुग्णांनी व्यक्त केली. शुक्रवारी जागतिक परिचारिका दिन असून, याच दिवशी आम्ही सुश्रूषा केलेले रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचा आनंद तो आमच्यासाठी अमूल्य ठेवा असल्याची प्रतिक्रिया कोविड रुग्णालयातील परिचारिकांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात अद्याप ८४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १२ व्यक्ती मृत्यू झालेत. एक रुग्ण जीएमसी, नागपूर येथे रेफर करण्यात आला आहे. आतापर्यंत ४५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. २६ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.
११ पुरूष, १३ महिलांचा समावेश
मंगळवारी बरे होऊन घरी गेलेल्या २४ रुग्णांमध्ये ११ पुरूष आणि १३ महिलांचा समावेश आहे. खोलापुरी गेट येथील पाच महिला व तीन पुरुष अशा आठ जण आहेत. हनुमाननगर येथील एका महिलेचा समावेश आहे. कंवरनगर येथील दोन महिला व एक पुरुष अशा तिघांचा समावेश आहे. नालसाबपुरा येथील दोन पुरुष व दोन महिला, काटा सुफियानगर येथील एका पुरुष, गौसनगर येथील एक पुरुष, ताजनगर येथील तीन महिला व तीन पुरुष अशा सहा जणांचा समावेश आहे. एकूण २४ व्यक्तींना आज सुरक्षितरीत्या घरी सोडण्यात आले.
डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रूग्णसेवा देत आहेत. महापालिका हद्दीतील २४ रुग्ण मंगळवारी बरे होऊन परतले, याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही बातमी दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्य चिकित्सक
कोरोनाविरूद्धचा लढा हा सामूहिकपणे लढावा लागणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर काळजी घ्या. कामे असतील तरच घराबाहेर पडा. कोविड रूग्णालयातून बरे होऊन घरी परतणाºयांनी समाजात इतरांना कोरोनापासून सावधगिरी बाळगण्याचा संदेश द्यावा.
- वर्षा पागोटे,
परिचारिका, कोविड रूग्णालय