पुन्हा अवकाळीचा फेरा; आता रब्बीलाही धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 09:59 PM2024-02-11T21:59:06+5:302024-02-11T22:00:19+5:30
वातावरण बदलाने तीन दिवसांपासून तापमान कमी झालेले आहे. शिवाय उत्तरेकडून थंड वारेदेखील वाहत आहे व ढगाळ वातावरणदेखील आहे.
अमरावती : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद झालेली आहे. सद्य:स्थितीत तुरीच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे व हरभऱ्याचा हंगाम सुरू होत आहे. गहू ओंबी धरण्याच्या स्थितीत आहे. अशा वेळेस काही ठिकाणी रात्री अवकाळीची नोंद झालेली असली तरी अधिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आणखी पाऊस झाल्यास पिके धोक्यात येणार आहेत.
वातावरण बदलाने तीन दिवसांपासून तापमान कमी झालेले आहे. शिवाय उत्तरेकडून थंड वारेदेखील वाहत आहे व ढगाळ वातावरणदेखील आहे. त्यामुळे उशिरा पेरणी झालेल्या हरभऱ्यात गाठे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शिवाय सोंगणी काळात तूर व काही भागात हरभऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी धामणगाव तालुक्यातील तळेगाव-दशासर भागात अवकाळी पावसासह गारपीट झालेली आहे. शिवाय १२ महसूल मंडळांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते व दुपारी तापमान कमी झाले आहे.