‘पहिली’साठी ५ वर्ष ८ महिने वयोमर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 10:47 PM2018-02-06T22:47:03+5:302018-02-06T22:47:27+5:30
राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्याला ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाच वर्ष आठ महिने वय पूर्ण असणे आवश्यक आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्याला ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाच वर्ष आठ महिने वय पूर्ण असणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तशा आशयाचा एक आदेश पारित केला आहे. यापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना पहिलीत प्रवेश देण्यात आला, तर हे प्रवेश रद्द ठरविले जातील, असा इशारा प्राथमिक शिक्षण विभागाने दिला आहे.
पहिलीच्या प्रवेशासाठी राज्यात वयोमर्यादेविषयी आजपर्यंत मोठा घोळ सुरू होता. सर्वसाधारणपणे पहिलीतील प्रवेशासाठी वय पाच वर्ष पूर्ण हा निकष गृहीत धरून शाळांमध्ये प्रवेश दिले जात होते, तर काही ठिकाणी पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच प्रवेश देण्याचा पराक्रम संस्थाचालकांनी केला होता.
बालमानसशास्त्र अभ्यासकांच्या मते, बालकांना त्यांच्या मेंदूची पूर्ण क्षमतेने वाढ होण्यापूर्वी शाळेमध्ये पहिलीत प्रवेश दिल्यास, त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होतो. हा धोका अनेकदा निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतरही राज्यात कमी वयात शाळेत प्रवेश देण्याचे प्रकार सुरू आहेत. यामध्ये विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळा आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेच ही वयोमर्यादा घालून दिली आहे. यापुढे ३० सप्टेंबर रोजी ५ वर्ष ८ महिने पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पहिलीच्या इयत्तेत प्रवेश मिळणार आहे. ही वयोमर्यादा मराठी असो वा इंग्रजी, प्रत्येक माध्यमाच्या शाळेसाठी ही अनिवार्य आहे.
३० सप्टेंबर ऐवजी ३० जुलै!
पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने वय निश्चित केले आहे. प्रत्येक शाळेसाठी ते बंधनकारक आहे. इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा त्यांचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे आल्या आहेत. त्या शाळांनी ३० सप्टेंबरऐवजी ३१ जुलै ही तारीख वय निश्चितीसाठी ग्राह्य धरून प्रवेश सुरू केले आहेत. नर्सरी, ज्युनिअर-सिनीअर केजीतील मुलांना पहिलीत आणण्यासाठी हा नियम डावलला जात आहे.