तेलाच्या पुनर्वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन नेमणार एजंसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:53 PM2019-03-13T22:53:34+5:302019-03-13T22:54:01+5:30
तेलाचा वारंवार पुनर्वापर हा आता नियमानुसार नियमबाह्य ठरतो. त्यानुसार भारतीय फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटीच्या सूचनेवरून शासनाने त्यावर १ मार्चपासून निर्बंधही आणला आहे. हॉटेलमध्ये तेलाचे पुनर्वापर झाले किंवा नाही, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासन एक अधिकृत एजंसी नेमण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तेलाचा वारंवार पुनर्वापर हा आता नियमानुसार नियमबाह्य ठरतो. त्यानुसार भारतीय फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटीच्या सूचनेवरून शासनाने त्यावर १ मार्चपासून निर्बंधही आणला आहे. हॉटेलमध्ये तेलाचे पुनर्वापर झाले किंवा नाही, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासन एक अधिकृत एजंसी नेमण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली.
शहरात खाद्यपदार्थ तळण्याकररिता खाद्यतेलाचा सर्रास पुनर्वापर केला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच यासंदर्भाची दखल एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनाची जी काही गाइडलाइन आहे, त्यासंदर्भाची माहिती नोंदणीकृत व्यावसायिक व परवानाधारक हॉटेल्स चालकांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहे तसेच अनौपचारिक पुनर्वापर होत असलेल्या तेलाचे नमुनेसुद्धा घेऊन ते तपासणीकरिता पाठविण्यात येणार असल्याची माहिती अन्नपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बुधवारी शहरात हॉटेलची तपासणी करण्याकरिता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करुन त्याद्वारे तपासणी करण्यात आली आहे. मात्र नेमके किती हॉटेलची तपासणी केली व काय कारवाई केली, यासंदर्भाची माहिती जाहीर करण्यात आली नाही. शहरात अनेक किरकोळ व्यावसायिकांनी हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय थाटले आहेत. रस्त्यावरच खाद्यपदार्थ तयार केले जातात तसेच याच ठिकाणी खाद्यतेलाचा पुनर्वापर केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अनेक व्यावसायिकांनी तर एफडीएकडे अधिकृत नोंदणीसुद्धा केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. खाद्यपदार्थ विक्र ीच्या व्यवसायासाठी एफडीएची परवानगी गरजेची आहे.
शासनाच्या तेलाच्या पुनर्वापरासंदर्भात ज्या गाईडलाइन्स आहेत, त्या तपासून नोंदणीकृत हॉटेलचालकांना पाठविण्यात येणार आहेत. तेलाची गुणवत्ता तपासणीकरिता शासन अधिकृत एजन्सीची नेमणूक करू शकते. आमच्या स्तरावर हॉटेलचालक दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त अन्न व प्रशासन विभाग अमरावती.