संतप्त शेतक-याने सोयाबीनची पेटविली गंजी, निसर्गाच्या अवकृपेने सात एकरांवर फेरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 09:09 PM2017-11-05T21:09:32+5:302017-11-05T21:10:02+5:30
परतवाडा : सात एकर शेतजमिनीवर सोयाबीन पिकाची पेरणी केल्यावरसुद्धा सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत.
परतवाडा : सात एकर शेतजमिनीवर सोयाबीन पिकाची पेरणी केल्यावरसुद्धा सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. पेरणी, कापणी व मळणीचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने व त्यातून काहीच मिळकत मिळणार नाही, हे लक्षात येताच वैतागलेल्या शेतक-याने सोयाबीन गंजी पेटविली. ही घटना शनिवारी अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे उघडकीस आली.
असदपूर येथील उमेश केशवराव मुंदाने (३९) या युवा शेतक-याने कसबेगव्हाण रस्त्यावर सात एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. यावर्षी तरी चांगले पीक येईल, या अपेक्षेवर पेरणी ते कापणीपर्यंत त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. कापणी केल्यावर सोयाबीनच्या शेंगा पोचट निघाल्या. मळणी यंत्राचे भाडेसुद्धा निघणार नव्हते. त्यामुळे कुटाराचे करायचे तरी काय, असा प्रश्न त्याला पडला.
सात एकर शेतजमिनीसाठी बियाणे, खत, डवरणी, फवारणी, निंदण आदीवर जवळपास ४० हजार रुपये खर्च झाले. कापणी केल्यावर मळणीसाठी अकराशे रुपये प्रतिएकरप्रमाणे एकरी भाव सांगितला. मात्र गंजीतून एवढे सोयाबीन निघणार नव्हते.
कापणी केल्यानंतर काहीच मिळणार नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे वाईट दिवस असून दुसरीकडे सोयाबीनला भाव नाही. यामुळेच गंजीला आग लावण्याचा निर्णय घेतला.
- उमेश किसनराव मुंदाने, शेतकरी