प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने येवदा ग्रामपंचायतसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:03+5:302021-08-12T04:16:03+5:30
फोटो - येवदा फोल्डर येवदा : गावातील समस्यांबात ग्रामपंचायतीकडे जाब विचारणाऱ्या आंदोलकांना आवरण्यासाठी येवद्यात राखीव पोलीस दलाच्या तुकडीला पाचारण ...
फोटो - येवदा फोल्डर
येवदा : गावातील समस्यांबात ग्रामपंचायतीकडे जाब विचारणाऱ्या आंदोलकांना आवरण्यासाठी येवद्यात राखीव पोलीस दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. सोमवारी प्रहार पक्षाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
येवदा येथील गांधी चौकात ग्रामपंचायतसमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप वडतकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थांच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या समस्यांसाठी आंदोलन केले. यात प्रामुख्याने ईटकी रस्ता, लेंडी नाल्यावरील पूल, वीजपुरवठा, मजीप्राची टाकी, मग्रारोहयो व घरकुल योजनांचे मस्टर व ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबाबत प्रहारचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांनी लक्ष केंद्रित केले. काही अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. यामध्ये गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर यांच्याकडे आंदोलकांनी केली. आज या ठिकाणी गटविकास अधिकारी हजर असते, तर त्यांची खुर्चीचा ग्रामपंचायतसमोर लिलाव केला असता, असे वडतकर म्हणाले. आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशराही त्यांनी दिला. आंदोलकांना नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर, महावितरणचे उपअभियंता चेतन माहोकार, कोकणे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता निबुंदे तसेच पंचायत समितीचे अधिकारी हे सामोरे गेले. पोलीस निरीक्षक अमूल बच्छाव, दुय्यम ठाणेदार अशोक पाटील यांनी चोख बंदोबस्त लावला होता. आंदोलनात बापुसाहेब साबळे, डॉ. दिनेश म्हाला, महेश कुरळकर, सुधीर पवित्रकार, प्रवीण कासारकर, आकाश घटाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप झाला.