शेतमजुराची लेक ठरली सुवर्णकन्या; सर्वाधिक ५ सुवर्ण, ४ रौप्य व २ राेख पारितोषिके पटकाविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 12:34 PM2022-05-26T12:34:29+5:302022-05-26T12:44:42+5:30
विद्यापीठ अंतर्गत सर्वाधिक पाच सुवर्ण, चार रौप्य व दोन राेख पारितोषिके पटकाविण्याचा बहुमान तिने मिळविला आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षांत साेहळ्यात अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची अश्विनी हागे ही शेतमजुराची लेक सुवर्णकन्या ठरली. विद्यापीठ अंतर्गत सर्वाधिक पाच सुवर्ण, चार रौप्य व दोन राेख पारितोषिके पटकाविण्याचा बहुमान तिने मिळविला आहे. अश्विनी या सुवर्णकन्येचे कौतुक बघण्यासाठी आई-वडिलांसह प्राध्यापक, प्राचार्य उपस्थित होते.
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी दीक्षांत सोहळा थाटात पार पडला. या साेहळ्याचे विशेष पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ऑनलाइन उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे होते. तर पाहुणे म्हणून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य उत्पल टोंगो, वसंत घुईखेडकर आदि उपस्थित होते.
मला आयएएस व्हायचंय - अश्विनी हागे
विद्यापीठ परिक्षेत्रातून सर्वाधिक पदके, पारितोषिके पटकावणारी सुवर्ण कन्या अश्विनी हागे हिला आयएएस होऊन देशाची सेवा करायची आहे, असे ती लोकमत’शी बोलताना म्हणाली. अकोट येथील गजानन हागे या शेतमजुराची ती लेक असून, आई सविता या गृहिणी आहे. घरात बेताचीच परिस्थिती; मात्र सावित्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वडिलांनी आम्हा चौघाही भावंडांना पदवीपर्यंत शिक्षण दिले. पदवीच्या प्रथम वर्षाला असतानाच मेरिट येण्याचे स्वप्न होते, ते पूर्ण आज केले. प्राचार्य, प्राध्यापकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. आयएएस करण्याची तयारी सुरू झाली आहे. हल्ली तेल्हारा येथील पोस्टात प्रबंधकपदी सेवा देत असल्याची माहिती अश्विनी हिने दिली.
अंदाजपत्रकात अनेक उपक्रमांसाठी तरतूद
कुलगुरू डॉ. मालखेडे विद्यापीठाच्या विकासासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात संशोधन अनुदान योजनेसह दिव्यांगांच्या सोयीसुविधांची तरतूद आहे. बुलडाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालयासाठी विद्यापीठ निधीतून दीड कोटी, विद्यापीठ ग्रंथालयासाठी ३.६९ कोटी, परिसर सुशोभीकरणासाठी ९० लाख, आयसीटी प्रकल्पासाठी ५० लाख, कुलगुरू अकादमिक गुणवत्ता पुरस्कार योजना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बहुसुविधा केंद्र यासाठी १.७५ काेटी तरतुदींचा समावेश असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी सांगितले.
५५ हजार विद्यार्थ्यांना पदवी
दीक्षांत सोहळ्यात कुलगुरूंसह अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध गुणवंतांना १११ सुवर्णपदके, २२ रौप्यपदके, २१ रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. एकूण ५५ हजार १९ विद्यार्थ्यांना पदवी व १२५ विद्यार्थ्यांना पदविका प्राप्त झाली.
दीक्षांत साेहळ्याची वैशिष्ट्ये
- कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी १११ सुवर्णपदक, २२ रौप्यपदक व २१ रोख पारितोषिकांचे वितरण केले. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार केला.
- सर्वाधिक पारितोषिके विज्ञान स्नातक अंत्य परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी गजानन हागे हिला गौरविले.
- वाङ्मय पारंगत (मराठी) परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल गो. सी. टोम्पे महाविद्यालय, चांदूर बाजार येथील विद्यार्थी किरण इंगळे याचा गौरव झाला.
- अभियांत्रिकी स्नातक परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील विद्यार्थी मिथिलेश जोशी याचा सन्मान करण्यात आला.
- विद्यापीठ परिक्षेत्रातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न असलेल्या डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थिनी अंकिता सातोणे हिने आयुशल्य विज्ञान स्नातक परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.