भाऊसाहेबांच्या जन्मगावी लवकरच कृषी महाविद्यालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:00 AM2021-11-25T05:00:00+5:302021-11-25T05:00:56+5:30
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, मी महाविद्यालयात असताना कृषी आणि शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेबांनी केलेले कार्य ऐकले होते. आज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात आल्यानंतर अनुभवले. पंतप्रधान नेहरूंच्या काळात देश प्रगतीकडे वाटचाल करीत होता. देशात नव्या उद्योगक्रांतीचे धोरण आखले जात होते, त्यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषिमंत्री म्हणून कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भाऊसाहेब हे शिक्षण व कृषिमहर्षी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे लवकरच कृषी महाविद्यालय स्थापन होणार असल्याचे संकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे दिले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचलित श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यपाल बोलत होते. समारंभाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख होते. विशेष अतिथी म्हणून महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांच्यासह संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सचिव शेषराव खाडे, प्राचार्य नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, मी महाविद्यालयात असताना कृषी आणि शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेबांनी केलेले कार्य ऐकले होते. आज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात आल्यानंतर अनुभवले. पंतप्रधान नेहरूंच्या काळात देश प्रगतीकडे वाटचाल करीत होता. देशात नव्या उद्योगक्रांतीचे धोरण आखले जात होते, त्यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषिमंत्री म्हणून कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भाऊसाहेब हे शिक्षण व कृषिमहर्षी आहेत. त्यामुळे त्यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालयाची निर्मिती व्हावी, असा प्रस्ताव श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देताच त्या अनुषंगाने कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, आदींची यासंदर्भात बैठक घेतली. आतापर्यंत राज्यात स्थापन झालेल्या कृषी महाविद्यालयांची संख्या, माहिती जाणून घेतली. भाऊसाहेबांच्या जन्मगावी कृषी महाविद्यालय स्थापन व्हावे, यासाठी स्वत: पुढाकार घेणार असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
दरम्यान, महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांनीसुद्धा संबोधित केले. दर्यापूर येथील जे.डी. सांगळूदकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समारंभात स्वागतगीत गायिले. संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन दिलीप इंगाले यांनी केले.
भाऊसाहेबांच्या जन्मगावी भेट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी भाऊसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याची पाहणी केली. कुटुंबातील सदस्य रजनी भीमराव देशमुख, कुसुमताई देशमुख, महेंद्र देशमुख, अनुप्रीता देशमुख, विद्यानंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पापळ येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेला भेट दिली व नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आ. प्रताप अडसड, जिल्हाधिकारी पवनीत कौर, संस्थेचे सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी उपस्थित होते.
भाऊसाहेबांचा भारतरत्न देऊन सन्मान करा
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. राज्यात दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाची श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून त्याद्वारे गाव, खेड्यात शाळा, महाविद्यालयांची निर्मिती केली. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे केंद्र सरकारने डॉ. भाऊसाहेबांना ‘भारतरत्न’ उपाधीने सन्मानित करावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी प्रास्ताविकातून केली.