विमा कंपनीविरुद्ध कृषी विभागाचा एफआयआर
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 5, 2023 05:24 PM2023-06-05T17:24:52+5:302023-06-05T17:25:09+5:30
कंपनीच्या दिरंगाईने शेतकरी परताव्यापासून वंचित, एसएओंची तक्रार
अमरावती : भारतीय कृषिविमा कंपनी प्रतिनिधींच्या त्रुटी, दिरंगाई व हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी कंपनीचे राज्य व्यवस्थापक दीपक पाटील, क्षेत्रीय व्यवस्थापक शकुंतला शेट्टी व जिल्हा समन्वयक नितीन सावळे यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली.
पीकविमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे कृषिविभाग त्रस्त झालेला आहे. मागच्या खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान, यामध्ये प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पंचनाम्याच्या प्रतीची मागणी सप्टेंबर, २०२२ पासून कृषी विभागाद्वारा सतत करण्यात आली आहे. मात्र, कंपनीद्वारा अद्यापही पंचनाम्याच्या प्रती देण्यात आल्या नाहीत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सभेत कंपनीद्वारा परताव्याची प्रलंबित १० कोटींपर्यंतची रक्कम १५ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात अद्यापर्यंत परतावा दिलेला नाही.
पीकविम्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना, यांचे समाधान कंपनीद्वारा केल्या जात नाही. वारंवार पाठपुरावा करण्यात येत असताना कंपनीद्वारा सहकार्य करण्यात येत नाही. त्यामुळे योजनेत सहभागी शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.