Amravati | कृषीमंत्र्यांचा मुक्काम साद्राबाडीत अन् पाच किमी अंतरावर शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 03:32 PM2022-09-01T15:32:14+5:302022-09-01T15:38:57+5:30
अनिल ठाकरेच्या मृत्यूनंतर धारणी येथील रुग्णालयात नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.
पंकज लायदे
धारणी (अमरावती) : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी बुधवारी रात्रीपासून मेळघाटातील साद्राबाडी (ता. धारणी) गावात मुक्कामी होते अन् तेथूनच पाच किमी अंतरावर असलेल्या लाकटू गावातील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली.
अनिल सूरजलाल ठाकरे (२५) असे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केलेल्या आदिवासी शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे कर्जाने घेतलेल्या ट्रॅक्टरची मासिक किस्त भरायला पैसे नसल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले, असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले.
ना. अब्दुल सत्तार बुधवारी रात्री ११ वाजता साद्राबाडी येथे पोहोचले. गावात एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. वृत्त लिहिस्तोवर ते याच गावात होते. येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर लाकटू गावात ही घटना घडली. अनिल सूरजलाल ठाकरे (२५) हा वडिलोपार्जित दोन हेक्टर शेती वडील व मोठ्या भावासमवेत कसत होता. त्याच शेतीवर खासगी कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. त्याची दरमहा किस्त सुरू होती.
अतिवृष्टीमुळे कपाशीचे पीक पूर्णत: खराब झाल्याने किस्त भरण्याकरिता त्याच्याकडे पैसे नव्हते. दुसरीकडे कृषी विभागाने पिकांचा पंचनामा केलेला नसल्याने नुकसानभरपाईचा पत्ता नव्हता. अशात अनिल बुधवारी सकाळी घरून निघून गेला व धारणी-सुसर्दा मार्गावरील राणापिसा फाट्यावर विषारी औषध प्राशन केले. याची माहिती आई लीलाबाई ठाकरे व पत्नी बिंदा ठाकरे यांना मिळताच दोघींनी पळतच राणापिसा फाटा गाठला. रस्त्यातील वाहनात बसवून सुसर्दा गावातील खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने साद्राबाडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. प्राथमिक उपचारानंतर त्याच्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी दिवसभर उपचार करण्यात आले. रात्री दहा वाजता त्याचा मृत्यू झाला.
निलंबनाची मागणी
अनिल ठाकरेच्या मृत्यूनंतर धारणी येथील रुग्णालयात नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. कृषी विभागाने नुकसानाचे पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी व शेतकरी आत्महत्याला दोषी असलेल्या धारणी येथील कृषी अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेंद्र मालवीय यांनी यावेळी केली.
शेतकरी आत्महत्येची माहिती मिळाली. कृषी अधिकाऱ्यांना चौकशी करायला सांगून त्याला तात्काळ मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, याकरिता कृषी विभागाच्या ध्येय-धोरणांमध्ये बदलांबाबत सरकार प्रयत्नशील आहे.
- अब्दुल सत्तार, कृषी मंत्री
उंदराचे औषध प्राशन केलेला युवक रुग्णालयात दाखल झाला होता. ती औषधी आतड्यांमध्ये चिकटल्याने त्याच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही.
- जामकर, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, धारणी