‘त्या’ इमारतींवर ‘एआयसीटीई’चा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:45 PM2019-01-30T22:45:38+5:302019-01-30T22:46:03+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या एमबीए, संगणक शास्त्र आणि केमिकल टेक्नॉलॉजी या विभागाच्या इमारती बांधकामावर आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल इन्स्टिट्यूट (एआयसीटीई) ने ठपका ठेवला आहे. या इमारती विद्यार्थी केंद्रीत नसल्याने येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया करू नये, असे कळविले आहे.

AICTE blames 'those' buildings | ‘त्या’ इमारतींवर ‘एआयसीटीई’चा ठपका

‘त्या’ इमारतींवर ‘एआयसीटीई’चा ठपका

Next
ठळक मुद्देविद्यापीठात पत्र : एबीए, संगणक, केमिकल टेक्नॉलॉजीच्या प्रवेशास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या एमबीए, संगणक शास्त्र आणि केमिकल टेक्नॉलॉजी या विभागाच्या इमारती बांधकामावर आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल इन्स्टिट्यूट (एआयसीटीई) ने ठपका ठेवला आहे. या इमारती विद्यार्थी केंद्रीत नसल्याने येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया करू नये, असे कळविले आहे.
उच्च व तंत्र शिक्षणसंदर्भात दरवर्षी एआयसीटीई आढावा घेते. त्याअनुषंगाने अमरावती विद्यापीठाच्या एमबीए, संगणकशास्त्र आणि केमिकल टेक्नॉलॉजी या तीन विभागांचे कागदपत्रे तपासण्यात आले. त्यानुसार या तीनही विभागाच्या इमारतींचे बांधकाम निकषानुसार करण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या पायाभूत सुविधा पुरविल्या नसल्याबाबतचे पत्र एआयसीटीईने विद्यापीठाला पाठविले आहे. अमरावती विद्यापीठाने यापूर्वी ‘एआयसीटीई’कडे केलेल्या कागदपत्राच्या पाठपुराव्यानुसार त्रुटी काढल्या आहेत. यासंदर्भात मंगळवारी मुंबई येथे उच्च व तंत्र विभागात महत्त्वाची बैठक घेण्यात आली. यात तीनही विभागाच्या इमारत बांधकामाविषयी असलेल्या त्रुटींच्या पूर्ततेसाठी विभागप्रमुखांनी बैठकीत कागदपत्रे सादर केली आहे. सध्याचे इमारतींचे छायाचित्र् देखील देण्यात आले आहेत. मात्र, त्रुटींची पूर्तता होईस्तोवर या तीनही विभागाच्या अभ्यासक्रमाचे येत्या वर्षात शैक्षणिक प्रवेश घेऊ नये, असे एआयसीटीईने यापूर्वीच विद्यापीठाला कळविले आहे. या तीनही विभागात सेमिनार हॉल नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. इमारतींचे बांधकाम करताना विद्यार्थी हित जोपासले नाही, ही बाब आर्वजून नोंदविली आहे. विद्यापीठात ‘एआयसीटीई’चे पत्र धडकल्यानंतर धावपळ सुरू झाली आहे. त्रुटी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने नियोजन चालविले आहे. याप्रकरणी कुलगुरू हे देखील लक्ष देत असल्याची माहिती आहे. येत्या शैक्षणिक वर्षात या तीनही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही अडचणी येऊ नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तयारी चालविली आहे. इमारत बांधकाम संदर्भात असलेल्या त्रुटी लवकरच दूर केल्या जातील, अशी माहिती आहे.

‘ एआयसीटीई’ने एमबीए, संगणक शास्त्र आणि केमिकल टेक्नॉलॉजी या विभागाचे कागदपत्रे तपासली आहे. इमारतींमध्ये सेमिनार हॉल नसल्याचा आक्षेप घेतला आहे. या त्रुटी लवकरच दूर केल्या जातील. येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाबाबत कोणतीही अडचण येणार नाही.
- मुरलीधर चांदेकर
कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

Web Title: AICTE blames 'those' buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.