कपाशी, सोयाबीनसाठी २५० कोटींची मिळणार मदत !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:14 PM2024-07-31T12:14:09+5:302024-07-31T12:16:38+5:30

Amravati : हेक्टरी पाच हजारांची शासन मदत ऑनलाइन पेरा नोंदविला असेल तरच लाभ

Aid of 250 crores will be provided for cotton and soybeans! | कपाशी, सोयाबीनसाठी २५० कोटींची मिळणार मदत !

Aid of 250 crores will be provided for cotton and soybeans!

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाने कपाशी व सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात घट झाली व वर्षभर हमीभावही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही. त्यामुळे या दोन्ही पिकांना हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टरच्या मर्यादेत शासन मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान २५० कोटींची मदत मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या दोन्ही पिकांचे ५.१० लाख हेक्टर क्षेत्र होते.


दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला आठ ते दहा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे गतवर्षीदेखील मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावदेखील मिळाला नाही. पावसाअभावी सरासरी उत्पन्नात घट झालेली असताना भावदेखील नसल्याने पिकांचा उत्पादन खर्च निघाला नाही. कपाशी पिकाचीदेखील हीच स्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे कपाशी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता व याबाबतचा आदेश सोमवारी जाहीर केला.

गतवर्षी सोयाबीनचे २,५२,५५१ हेक्टर व कपाशीचे २२,६१,४२७ हेक्टरमध्ये क्षेत्र होते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली नाही, असे गृहीत धरता किमान पाच लाख हेक्टरसाठी २५० कोटींचा लाभ शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शासनादेश जारी झाल्याने शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी मदत मिळण्याची शक्यता आहे.


ई-पीक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ
दोन वर्षापासून खरिपाचा पीक पेरा ऑनलाइन नोंदविण्यात येत आहे. यामध्ये मोबाइल अॅपद्वारे ज्या खातेदारांनी ई-पीक पाहणी केली त्याच शेतकऱ्यांना शासन मदतीचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी राहिली होती, ती प्रक्रिया नंतर तलाठी यांच्याद्वारा पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन हेक्टर मदित सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.


खातेदार किती, प्रशासनातच संभ्रम
खरीप २०२३ मध्ये किती शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली, याची माहिती महसूलकडे उपलब्ध आहे. मात्र कपाशी व सोयाबीनचा पीकनिहाय ऑनलाइन पेरा, नोंद झालेले क्षेत्र किती, याची माहिती उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने सांगितले. ई-पीक पाहणी हा महसूलचा प्रकल्प असल्याने आमच्याकडे याची माहिती उपलब्ध नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.


खरीप २०२३ मधील कपाशी, सोयाबीनचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका                 सोयाबीन               कपाशी

धारणी                      ७०२१                     १०४१६
चिखलदरा                ७८३५                      ३०४९
अमरावती                 ३१२२०                    १२००८
भातकुली                 २८८६५                    १२८२४
नांदगाव खं.              ४७०४७                    ६९३०
चांदूर रेल्वे               २४९०५                    ८३१८
तिवसा                     १७७०५                   १६७७३
मोर्शी                       १४३९९                    ३२०२१
वरूड                      १५८४                     २७९५८
दर्यापूर                    १३४८७                    ४८७३६
अंजनगाव                १३१७९                     २०७०६
अचलपूर                  ८७२८                      ९९२४
चांदूरबाजार              ९४५०                     १३५४९
धामणगाव               २१८३१                     २३८१२
एकूण                   २५२५५१                    २६१४२७

Web Title: Aid of 250 crores will be provided for cotton and soybeans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.