प्रत्येक तालुक्यात अनुदानित महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:43 AM2017-12-05T00:43:20+5:302017-12-05T00:43:41+5:30
प्रत्येक तालुक्यात विनाअनुदान तत्त्वावरील विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयांना अनुदानित तत्त्वावर आणले जाणार आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : प्रत्येक तालुक्यात विनाअनुदान तत्त्वावरील विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयांना अनुदानित तत्त्वावर आणले जाणार आहे. त्याकरिता शासकीय धोरणांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सोमवारी येथे दिली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विनाअनुदान तत्त्वाच्या महाविद्यालयांना अनुदान तत्त्वावर आणण्यासाठी कार्यबल गटाच्या अध्यक्षपदी कुलगुरू चांदेकर यांची २ डिसेंबर रोजी नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ही समिती सन २००८ पासून कार्यरत आहे. केवळ अध्यक्ष म्हणून माझ्यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे. या समितीचे कार्य जवळपास संपुष्टात आले असून, प्राध्यापकांची नियुक्ती, शिक्षण आदी तपासणीचे कार्य संपल्यागत आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात ही समिती प्रस्ताव मागवेल. यासाठी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधा तपासल्या जातील. निकषांवरच समिती महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठीच्या प्रस्तावावर मंथन करेल. गुणवत्तेशी तडजोड होणार नाही.
अशी आहे कार्यबल गट स्थापना समिती
कार्यबल समितीच्या अध्यक्षपदी कुलगुरु मुरलीधर चांदेकर आहेत. सदस्य म्हणून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर.एस. माळी, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर आणि पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने यांचा समावेश आहे.