अयोध्या येथील विमानतळाला महर्षी वाल्मीकींचे नाव, भक्तांनी मानले सरकारचे आभार
By गणेश वासनिक | Published: December 30, 2023 09:40 PM2023-12-30T21:40:08+5:302023-12-30T21:43:01+5:30
महाराष्ट्र गुरुदेव महर्षी वाल्मीकी जयंती महोत्सव समितीच्यावतीने केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहे
गणेश वासनिक, अमरावती: महर्षी वाल्मीकी यांनी रामायण ग्रंथ लिहून प्रभू श्रीरामाचा आध्यात्मिक इतिहास जगासमोर आणला आणि तो अजरामर केला. हा गौरवपूर्ण इतिहास जगासमोर भावी पिढीला प्रेरणादायी राहावा, यासाठी त्यांच्या नावाने अयोध्या येथील विमानतळ आता ओळखले जाणार आहे. शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथील महर्षी वाल्मीकी यांचे नाव असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण केले. हा क्षण देशातील महर्षी वाल्मीकी भक्तांनी डोळ्यात साठवला असून, महाराष्ट्र गुरुदेव महर्षी वाल्मीकी जयंती महोत्सव समितीच्यावतीने केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहे.
प्रभू श्रीराम आणि गुरुदेव महर्षी वाल्मीकी यांच्यात आध्यात्मिक नाते आहे. अयोध्या येथे भव्यदिव्य प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जात असताना १८ डिसेंबर २०२० रोजी गुरुदेव महर्षी वाल्मीकी जयंती महोत्सव समितीच्यावतीने उमेश ढोणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे महर्षी वाल्मीकी यांचे आश्रम आणि मंदिराच्या निर्मितीची मागणी केली हाेती. तसेच या मागणीची प्रत अयोध्या मंदिराचे प्रमुख महंत नृत्यगोपालदास यांनाही पाठवली होती. मात्र ही मागणी शनिवारी पंतप्रधानांनी पूर्ण केल्याबद्दल महर्षी वाल्मीकी गुरुदेव जयंती समितीच्यावतीने पंतप्रधान व केंद्र सरकारचे जाहीर आभार मानले. या मागणीच्या पूर्ततेसाठी खासदार नवनीत राणा यांच्यासह ११ खासदारांचे शिफारस पत्र जोडून निवेदन पाठविले होते. विमानतळाला महर्षी वाल्मीकींचे नाव, आश्रमाची निर्मिती आदी क्षण गुरुदेव महर्षी वाल्मीकी भक्तांसाठी भूतो न भविष्यति असा असल्याची प्रांजळ कबुली देत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उमेश ढोणे, एकनाथ वावरे, प्रकाश दंदे, मीरा कोलटेके, गोपाळराव ढोणे, गजानन वानखडे, शरद खेडकर आदी महर्षी वाल्मीकी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.