एएसआयचा मुलगा निघाला दुचाकी चोरांचा साथीदार!
By admin | Published: January 21, 2016 12:39 AM2016-01-21T00:39:02+5:302016-01-21T00:39:02+5:30
शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु असताना पोलिसांच्या हाती काही दुचाकी चोरटे लागले.
गाडगेनगर पोलिसांची कारवाई : दोन दुचाकी जप्त, तीन घरफोडींचीही कबुली
अमरावती : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु असताना पोलिसांच्या हाती काही दुचाकी चोरटे लागले. दोन दिवसांपूर्वी शहर कोतवाली पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन पाच दुचाकी जप्त केल्यात. या प्रकरणात मिळालेल्या माहितीवरून बुधवारी गाडगेनगर पोलिसांनीही चार दुचाकी चोरांना अटक केली. त्यांच्याजवळून तीन दुचाकी सुध्दा जप्त केल्यात. या आरोपींमध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत एका सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या मुलाचाही सहभाग आहे.
शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून दुचाकी चोरांच्या मागावर होते. दरम्यान राजापेठ व कोतवाली पोलिसांच्या हाती अल्पवयीन दुचाकी चोर लागल्यानंतर आता गाडगेनगर पोलिसांच्या हातीही चार चोर लागले आहेत. पवन प्रवीण पवार (१९,रा. तिरुमाला कॉलनी), गौरव गजानन कांबे ( १९,रा. राठीनगर) व विक्की ढोके (२०,रा. सोनल कॉलनी) हे एका टोळीतील तीन आरोपी असून त्यांना गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. तसेच आरोपी अक्षय संजय गवई (२१, जय सियारामनगर) याला बुधवारी अटक केली आहे.
यातील पवन प्रवीण पवार हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. चोरी प्रकरणात गौरव कांबे हा मुख्य आरोपी असून अन्य साथिदारांना सोबत घेऊन तो चोऱ्या करीत होता. या चार आरोपींनी दोन घरफोडी व तीन दुचाकी चोरींची तर अक्षय गवई याने एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. चोरीच्या आणखी दुचाकींची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अटक केलेले आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांना यापूर्वीही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, तेथून बाहेर आल्यानंतर पुन्हा घरफोडी व दुचाकी चोरीचे सत्र त्यांनी सुरुच ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. राजापेठ व शहर कोतवाली पोलिसांनी अल्पयीनांजवळून अनुक्रमे तीन व पाच दुचाकी तर गाडगेनगर पोलिसांनी आरोपींकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
राजापेठ पोलिसांकडून वर्धेतून एक दुचाकी जप्त
स्टंटबाजी करणाऱ्या तीन अल्पवयीनांना राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच रेकॉर्डवरील आरोपी शुभम बद्रे यालाही अटक केली आहे. या आरोपींची चौकशी सुरु केली असता त्यांनी चोरीच्या पैशातून दुचाकी खरेदी केल्याचे उघड झाले होते. तीन अल्पवयीनांना नोटीस बजावून पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री वर्धा शहरात एका अल्पवयीन आरोपीला दुचाकीसह पकडण्यात आले. तो अल्पवयीन अमरावतीचा रहिवासी आहे. सहा महिन्यांपूर्वी राजापेठ पोलिसांनी त्या अल्पवयीनाला ताब्यात घेतले होते. वर्धा पोलिसांनी पकडलेली दुचाकी राजापेठ पोलिसांनी जप्त केली.
कोतवाली पोलिसांकडून अल्पवयीनांची चौकशी
शहर कोतवाली पोलिसांनी सात अल्पवयीनांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील पाच दुचाकी जप्त केल्या होत्या. अल्पवयीनांचा शेगाव नाक्यावर अपघात झाल्यानंतर दुचाकी चोरीचा पर्दाफाश झाला होता. अपघातानंतर एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाला . त्याचा शोध घेऊन पोलिसांनी दुचाकी व घरफोडीचोरांची टोळी गजाआड केली आहे. शहर कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या अल्पवयीनांची पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू यांनी चौकशी केली असून त्यांना पालकांच्या स्वाधिन केले आहे.