एआयएसएफने अडविला शिक्षणमंत्र्यांचा ताफा, १२ विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 05:42 PM2017-12-27T17:42:58+5:302017-12-27T17:55:29+5:30
सरकारी शाळांचे खासगीकरण व कंपनीकरण करण्याच्या शासननिर्णयाच्या विरोधात बुधवारी आॅल इंडिया स्टुंडट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी अंबिकानगरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आल्याने पोलिसांची चांगलीच ताराबंळ उडाली.
अमरावती : सरकारी शाळांचे खासगीकरण व कंपनीकरण करण्याच्या शासननिर्णयाच्या विरोधात बुधवारी आॅल इंडिया स्टुंडट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी अंबिकानगरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आल्याने पोलिसांची चांगलीच ताराबंळ उडाली.
फे्रजरपुरा पोलिसांनी १२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३४१ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविला. शिक्षणमंत्री विनोद तावडे बुधवारी अमरावती दौ-यावर आले होते. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख जयंती कार्यक्रम आटोपून त्यांचा ताफा महापालिका शाळेला भेट देण्यासाठी अंबिकानगर मार्गे निघाला होता. एआयएसएफचे जिल्हाध्यक्ष हिमांशू अतकरे यांच्या नेतृत्वात संदीप ढोणे, धीरज बनकर, अजिंक्य ढोके, ऐश्वर्या चुनडे, मनीषा कांबळे, सूरज मोने, मयूर राठोड, अमोल देवळेकर, अक्षय गायगोले, अतुल मानतकर, सुमीत कोरे आदींनी अंबिकानगरातील गणपती मंदिराजवळ शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. ‘शिक्षण खाते विनोद तावडे यांच्या तावडीत असला तरी, शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही’ अशी घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळाबंदीचा निषेध नोंदविला. शिक्षणमंत्र्यांनी त्यांचे वाहन थांबवून समस्या ऐकून घेतल्या व निवेदन सादर करण्यास सांगितले. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी १५ युवकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बियाणी चौकातील निषेध फसला
एआयएसएफचे कार्यकर्ते बियाणी चौकात शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडविणार होते. मात्र, येथे पोलिसांचा ताफा होता. संधी पाहून अंबिकानगरात ताफा अडवला गेला.
राज्य सचिव पोलिसांच्या ताब्यात
एआयएसएफ राज्य सचिव सागर दुर्याेधन यांना फे्रजरपुरा पोलिसांनी बुधवारी सकाळीच ताब्यात घेतले. त्यांना पूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे.