Akola Lok Sabha Results 2024 : अमरावतीत मतमोजणी निर्णायक वळणावर
By जितेंद्र दखने | Published: June 4, 2024 02:25 PM2024-06-04T14:25:48+5:302024-06-04T14:27:04+5:30
Akola Lok Sabha Results 2024 : महायुतीच्या नवनीत राणाची आघाडी पण कॉग्रेस उमेदवाराचे तगडे आव्हान; ७ फेऱ्यांमध्ये ४ लाख ५३ हजार २८४ मताची मोजणी पूर्ण
जितेंद्र दखने, अमरावती
Akola Lok Sabha Results 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मध्यमगतीने सुरू असून ती आता निर्णायक टप्प्यात आली आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मतमोजणीच्या २० पैकी ७ फेऱ्या पुर्ण झाल्या असून प्रारंभपासूनच महायुतीच्या नवनीत राणा यांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली आहे. त्यांना कॉग्रेसचे बळवंत वानखडे हे चांगली टक्कर देत असून उर्वरीत १३ फेऱ्यामध्ये काय उलटफेर होतो याकडे लक्ष लागून राहाले आहे.वर्तमान स्थितीत महायुतीच्या नवनीत राणा यांनी २ हजार ५४४ मतांची आघाडी घेतलेली आहे. त्यांना ७ व्या फेरी अखेर २ लाख १ हजार ९४७ मते मिळाली असून कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांना १ लाख ९९ हजार ४०३ मते मिळाली आहे. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी ३१ हजार ४५७ मते घेतली आहे.
अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये २६ एप्रिल रोजी अर्थात दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते. त्यामध्ये ११ लाख ६९ हजार १२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी आतापर्यंत ०७ फेऱ्यामध्ये ४ लाख ५३ हजार २८४ मतांची मोजणी झाली असून अद्यापही ७ लाख १५ हजार ८३७ मते मोजणे बाकी आहे.त्यामुळे आता उर्वरित फेऱ्यांमध्ये मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होईल.
सन २०१९ मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून नवनीत राणा या विजयी झाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थित उमेदवार म्हणून नवनीत राणा यांना ५ लाख १० हजार ९४७ मते मिळाली होती. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणांनी ३६ हजार ९५१ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत एकूण २४ उमेदवार रिंगणात होते. दलित. मुस्लीम मतांसह प्रोगामी विचारसरणीच्या मतदारांचा त्यावेळी नवनीत राणा यांना भक्कम पाठिंबा होता. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये देशात मोदीची लाट असताना नवनीत राणा या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या; मात्र यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राणा या भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. २०१९ च्या निवडणुकीनंतर नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून त्या एनडीएसोबत आहेत. मात्र राणांचा हा निर्णय पुरोगामी विचारसरणीच्या मतदारांना रुचला नाही. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा मतदार विरोधात गेल्याचे दिसून आहे.