अकोल्याच्या आसिफची हत्या दर्यापूर हद्दीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:03 PM2018-08-22T22:03:42+5:302018-08-22T22:04:23+5:30

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव (ता. बाळापूर) येथील माजी सरपंच तथा भारिप-बमसं नेते आसिफ खान यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. या हत्येचा प्लॉट मूर्तिजापूर शहर पोलीस आणि अकोला स्थानिक गुन्हे शाखेने शोधून काढला. दर्यापूर तालुक्यातील आमला येथे खून करण्यात आला. मंगळवारी मूर्तिजापूर पोलिसांनी आमला गावात येऊन घरझडती घेतली.

Akolay assife killed in Darayapur border | अकोल्याच्या आसिफची हत्या दर्यापूर हद्दीत

अकोल्याच्या आसिफची हत्या दर्यापूर हद्दीत

Next
ठळक मुद्देआमला गावात आवळला गळा : मूर्तिजापूर शहर पोलिसांकडून घरझडती

चेतन घोगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अकोला जिल्ह्यातील वाडेगाव (ता. बाळापूर) येथील माजी सरपंच तथा भारिप-बमसं नेते आसिफ खान यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. या हत्येचा प्लॉट मूर्तिजापूर शहर पोलीस आणि अकोला स्थानिक गुन्हे शाखेने शोधून काढला. दर्यापूर तालुक्यातील आमला येथे खून करण्यात आला. मंगळवारी मूर्तिजापूर पोलिसांनी आमला गावात येऊन घरझडती घेतली.
आसिफ खान यांची हत्या उघड झाली तरी ती कुठे झाली, याचा सुगावा पोलिसांना लागत नव्हता. मुख्य आरोपी ज्योती गणेशपुरे हिची बहीण आमला गावात राहते. या बहिणीचा मुलगा स्वप्निल नितीन वानखडे याच्या साहाय्याने आसिफ खान यांना मूर्तिजापूर शहरातून आमला येथील घरी आणले व गळा आवळून हत्या केल्याचे आरोपींनी पोलिसांसमोर कबूल केले. या प्रकरणातील तिसरा आरोपी वैभव अनिल गणेशपुरे असून, तो ज्योती गणेशपुरे हिचा मुलगा आहे. आसिफ खानच्या हत्येला अनैतिक संबंध व भूखंडाच्या आर्थिक वादाची किनार असून, तीन आरोपी अद्याप पसार आहेत.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्यात आसिफ खान हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी शोध घेतला असता, त्यांचे मूर्तिजापूर शहरातून अपहरण झाल्याचे तपासात समोर आले. २० आॅगस्ट रोजी पहाटे ३ च्या सुमारास बाळापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाकरिता मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. मूर्तिजापूर शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी तपास केला असता, आसिफ खान यांची हत्या दर्यापूर तालुक्यातील आमला गावातील स्वप्निल वानखडे याच्या राहत्या घरी करण्यात आल्याचे पुढे आले. स्वप्निलला २२ आॅगस्ट रोजी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आमला येथे त्याच्या घरी आणून चौकशी केल्याने दर्यापूर तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती.
म्हैसांग मार्गावर सीसीटीव्हीद्वारे तपासणी
आसिफ खानचा गळा आवळण्यात आला, त्या आमला गावातील स्वप्निल वानखडे याच्या घरी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. आमला-दर्यापूर-म्हैसांग मार्गात सीसीटीव्ही तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी दिली.
म्हणून निवडले आमला गाव
आसिफ खान खूनप्रकरणातील मुख्य आरोपी ज्योती गणेशपुरे वाशिम जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आहे. दर्यापूर तालुक्यातील आमला येथील तिच्या बहिणीचा मुलगा स्वप्निल वानखडे हा लहानपणापासून तिच्याजवळ होता. त्यामुळे दोघांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. आसिफ खान यांच्या खुनासाठी म्हणूनच आमला गावाची निवड करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
स्वप्नीलचे घर गावाच्या टोकाला
आसिफ खानचा गळा आवळला, त्या घरापासून काही अंतरापर्यंत वस्तीच नाही. गावाच्या शेवटच्या टोकापासून काही अंतर राखून असलेल्या या घराला सुमारे दहा फूट उंचीच्या कुंपणभिंती आणि पोलादी फाटक आहे. त्यामुळे आतमधील सहसा काहीच दिसत नाही. येथून मूर्तिजापूर शहराकडे जाण्या-येण्याकरिता चार रस्ते आहेत. मात्र, वाहतूक काहीच नसते, हे विशेष.

 

Web Title: Akolay assife killed in Darayapur border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.