चारचाकीतून दारू, ट्रकमधून रेती चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 05:00 AM2022-02-07T05:00:00+5:302022-02-07T05:01:02+5:30
वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंगजवळून एका कारमधून (क्र. एमएच ०१ एसी १७४४) १ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तेथून अजय पुंडलिकराव गुगलमाने (२०, शिराळा), श्रीकृष्ण गोंडुजी इंगळे (४२, शिराळा) यांना अटक करण्यात आली. ते दोघेही देशी दारूचे ३७ बॉक्स अवैधरीत्या नेताना मिळून आले. त्यांच्याकडून कारदेखील जप्त करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विशेष पथकाने वलगाव व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून होणाऱ्या अवैध दारू व रेती तस्करीला चाप लावला आहे. कारवाईदरम्यान रॉयल्टीपेक्षा अधिक रेती वाहून नेणारे दोन ट्रक व दारू वाहतूक करणारी कारदेखील जप्त करण्यात आली. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंगजवळून एका कारमधून (क्र. एमएच ०१ एसी १७४४) १ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तेथून अजय पुंडलिकराव गुगलमाने (२०, शिराळा), श्रीकृष्ण गोंडुजी इंगळे (४२, शिराळा) यांना अटक करण्यात आली. ते दोघेही देशी दारूचे ३७ बॉक्स अवैधरीत्या नेताना मिळून आले. त्यांच्याकडून कारदेखील जप्त करण्यात आली. तर गाडगेनगर हद्दीतील अमन पॅलेसजवळ अवैध रेतीवर धाड घालण्यात आली. मो. नातीक मो सादीक (३२, रा. अन्सारनगर) हा आपल्या ट्रकमध्ये (क्र. एमएच ४० सीडी ४१७२) १० ब्रास रेती वाहून नेताना मिळून आला. त्याला गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अन्य एक कारवाई शिराळा रोड रेल्वे क्रॉसिंग येथे करण्यात आली. तेथून शेख हारून शेख नूर (४२ रा. जमजमनगर, अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले. ट्रकमध्ये (क्र. एमएच २७ बीएक्स ०६६९) १५ ब्रास रेती वाहून नेताना कारवाई करण्यात आली. त्याला वलगाव पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ५ फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली.