मद्यपी डॉक्टराला चोप; रुग्णांच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 07:18 PM2018-04-02T19:18:34+5:302018-04-02T19:18:34+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यपी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाइकांनी चोप दिल्याचा प्रकार रविवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडला. कोतवाली पोलिसांनी नेत्रतज्ज्ञ तारासिंह परशराम आडे (४२) यांच्याविरुद्ध कलम ८५ (१), (२) अन्वये गुन्हा नोंदविला.
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यपी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाइकांनी चोप दिल्याचा प्रकार रविवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडला. कोतवाली पोलिसांनी नेत्रतज्ज्ञ तारासिंह परशराम आडे (४२) यांच्याविरुद्ध कलम ८५ (१), (२) अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी आडे यांच्या तक्रारीवरून सोमवारी मारहाण करणा-या युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अतिदक्षता विभागातील पेइंग वॉर्डमध्ये रविवारी रात्री नेत्रतज्ज्ञ डॉ. नरेश आडे यांची ड्युटी होती. मद्यधुंद अवस्थेत अतिदक्षता कक्षात पोहोचताच त्यांनी साहित्याची फेकाफेक करून काही जणांना शिवीगाळ केली. तेथे उपस्थित रुग्णांच्या नातेवाइकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कोणाचे ऐकून घेतच नव्हते. संतप्त नातेवाइकांनी अखेर डॉ. आडेंना चोप देत निवासी वैद्यकीय अधिकारी सुभाष तितरे यांच्या कक्षापर्यंत नेले. रुग्णालयात दाखल झालेल्या कोतवाली पोलिसांनी डॉ. आडेंना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. सुभाष तितरे यांच्या तक्रारीवरून आडेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, डॉ. आडेंना मारहाण करणारे स्वप्निल प्रभाकर साव (३०), अनिरुद्ध सुधाकर बोबडे (३३) व पीयूष सुभाष वसू (२८) या युवकांविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, ३४ सहकलम वैद्यकीय सेवा व्यक्ती संस्था नुकसानापासून प्रतिबंधक कायदा २०१० च्या कलम ३ अन्वये सोमवारी कोतवाली पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आहे.
डॉ. आडे यांना मद्यपानाची सवय आहे. रविवारी रात्री घडलेल्या प्रकाराचा अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. सद्यस्थितीत त्यांना कामावरून दूर ठेवण्यात आले आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन रुग्णालय
इर्विनच्या पेइंग वॉर्डमध्ये ड्युटीवर असणा-या डॉ. आडेंची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा नोंदविला आहे. डॉ. आडेंच्या तक्रारीवरून मारहाण करणा-या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे