‘कोरोना’ आरोग्य यंत्रणेला अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:01:01+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरू झालेले आहे. पुणे स्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) मध्ये आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. शहरात या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली तरी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण, निदान आणि उपचार सक्षम करणे आवश्यक असल्याचे आरोग्य संचालकांनी स्पष्ट केले आहे.

Alert the 'Corona' health system | ‘कोरोना’ आरोग्य यंत्रणेला अलर्ट

‘कोरोना’ आरोग्य यंत्रणेला अलर्ट

Next
ठळक मुद्देमहापालिकेची खबरदारी : आरोग्य संचालनालयाद्वारे मार्गदर्शन जारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चीनमधील कोरोना विषाणूमुळे राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाद्वारे महापालिकेला दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महापालिका आरोग्य विभाग दक्ष असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरू झालेले आहे. पुणे स्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) मध्ये आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. शहरात या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली तरी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण, निदान आणि उपचार सक्षम करणे आवश्यक असल्याचे आरोग्य संचालकांनी स्पष्ट केले आहे. इन्फ्ल्यूएन्झासदृश रुग्ण आणि श्वसनसंस्थेचा तीव्र प्रादुर्भाव असलेल्या आजाराचे सर्वेक्षण सर्व आरोग्य यंत्रणांनी करणे आवश्यक आहे. यामध्ये अचानक येणारा तीव्र ताप, खोकला, घसा बसणे, श्वसनास अडथळा तसेच पाच वर्षांखालील वयोगटात न्यूमोनिया असल्यास रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे.
निदानासाठी रुग्णाचे कोणते नमुने घ्यावेत, ते प्रयोगशाळेत कसे पाठवावेत, याची माहिती एनआयव्हीच्या संकेत स्थळावर दिली आहे. हे नमुने सीएसमार्फत राज्य आयडीएसपी यांच्या अनुमतीने पाठवावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय स्तरावर संसर्ग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. यामध्ये हात धुण्याची व्यवस्था, पीपीईची पुरेशी उपलब्धता, जैव-वैद्यकीय कचºयाची सुयोग्य विल्हेवाट या बाबींकडे विशेष लक्ष व सुसज्ज विलगीकरण कक्ष महत्त्वाचे आहे. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर व जीवनावश्यक प्रणाली सुविधा सक्षमपणे कार्यरत राहील, याची दक्षता महत्त्वाची आहे.

काय आहे करोना विषाणू?
साध्या सर्दी-खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्ससारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाºया एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटास ‘करोना’ विषाणू म्हणतात. सन २००३ मध्ये आढळलेला सार्स हादेखील करोना विषाणूच होता. सध्या चीनमध्ये आढळलेला विषाणू करोनाच आहे. तथापि, त्याची जनुकीय रचना पूर्णपणे नवीन असल्याने त्यास ‘नॉव्हेल करोना’ असे नाव देण्यात आले. कॉमन कोल्ड, श्वसन आजाराची गंभीर लक्षणे, श्वास घ्यायला अडथळा, न्यूमोनिया, अतिसार, काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे ही लक्षणे आढळतात.

प्रतिबंधक खबरदारी महत्त्वाची
विषाणूचा उद्भव अणि प्रसार माहीत नसले तरी प्रतिबंधक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. श्वसनसंस्थेशी निगडित व्यक्तींचा सहवास टाळावा. हातांची नियमित स्वच्छता ठेवावी. न शिजविलेले अन्न अथवा कच्चे मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धुता खाऊ नये. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर टिश्यू पेपरचा वापर करावा व हे टिश्यू पेपर झाकण असलेल्या कचरापेटीत टाकावे आदी खबरदारी आवश्यक आहे.

Web Title: Alert the 'Corona' health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.