‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट; संसर्ग टाळण्यासाठी लगतच्या खेड्यातील श्वानांवर करडी नजर
By गणेश वासनिक | Published: September 21, 2022 02:06 PM2022-09-21T14:06:32+5:302022-09-21T14:08:18+5:30
वन्यजीवांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना
अमरावती : राज्यात ‘लम्पी’च्या संसर्गाने ग्रासल्यामुळे आतापर्यंत हजारो जनावरे दगावली आहेत. संसर्ग रोखण्यासाठी जनावरांना युद्धस्तरावर लसीकरण केले जात आहे. वाघांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. ‘लम्पी’ हा आजार व्याघ्र प्रकल्पात पोहोचू नये, यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाघ, बिबट, हरिण, काळवीट, रानगवा आदी वन्यजीवांपर्यंत हा संसर्ग पोहोचणार नाही, याबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे.
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह अभयारण्यातील वन्यजीवांना ‘लम्पी’चा संसर्ग होऊ नये, यासाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना टिप्स देण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पानजीकची गावे, खेड्यातील भटक्या श्वानांवर करडी नजर ठेवली आहे. ‘लम्पी’ने दगावलेल्या पशूंच्या संपर्कातील भटके श्वान, शेळी वा मेंढी ही व्याघ्र प्रकल्पात जाणार नाही, याबाबत व्याघ्र प्रकल्पाने दक्षता घेतली आहे. व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
वन्यजीवांवर त्वचारोग वा कातडीवर वेगळे काही डाग तर नाही ना? याबाबत ट्रॅप कॅमेऱ्यातून तपासले जात आहे. त्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत वनविभाग घेत आहे. ताडोबा, मेळघाट, बोर, टिपेश्वर, काटेपूर्णा, पेंच, ज्ञानगंगा, सह्याद्री आदी अभयारण्यात ‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर अलर्ट करण्यात आले आहे.
राज्यात जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. ही बाब गंभीर असून, व्याघ्र प्रकल्पात हा संसर्ग पोहोचू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा यांसह अन्य वन्यजीवांना बाधा होणार नाही, यासाठी वन कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)