लंपी स्किन रोगाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:14+5:302021-08-22T04:16:14+5:30
अमरावती : गत जुलै महिन्यात राज्यातील पुणे, नाशिक, रायगड व पालघर या जिल्ह्यांमधील पशुधनामध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव आढळून ...
अमरावती : गत जुलै महिन्यात राज्यातील पुणे, नाशिक, रायगड व पालघर या जिल्ह्यांमधील पशुधनामध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
लंपी स्कीन डिसीज हा गाय व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या साथीच्या आजारात प्रामुख्याने जनावराच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. त्यामुळे जिल्ह्यात या आजाराचा पशुधनामध्ये संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी बाळगण्याचे निर्देश पशुसंर्वधन आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंह यांनी जि. प. सीईओंना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिले आहेत.
लंपी स्किन डिसीज रोग प्रादुर्भाव आढळून आलेल्या जिल्ह्यांना त्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जनावरांत लंपी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळून आल्यास संशयित पशूंचे आवश्यक नमुने तपासणीसाठी त्वरित रोग अन्वेषण विभाग, पुणे या संस्थेस पाठविण्याबाबत सूचना सीईओंना पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत. तथापि, या रोगाचा प्रसार इतर जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता असल्याने रोग प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने रोग प्रादुर्भावाच्या दरम्यान करावयाच्या कार्यवाहीबाबत आपल्या जिल्ह्यात जनावरांच्या संपर्कातील माणसांच्या हालचालींवर बंधन आणण्याची कार्यवाही करावी. हा रोग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होत असल्याबाबत तसेच रोगाचा प्रसार बाह्य कीटकाद्वारे होत असल्याबाबत व रोग प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत आपल्या जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये जनजागृती करावी, तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी जिल्ह्यात या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना सूचना देण्याचे सूचित केले आहे.
बॉक्स
सूचनांची अंमलबजावणी करा
केंद्र शासन व पशुसंवर्धन आयुक्तालयाने निर्गमित केलेल्या रोग प्रादुर्भावासंबंधित मार्गदर्शक सूचना व रोग तपासणीकरिता नमुने गोळा करण्याच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आवश्यक ती उपाययोजना तातडीने हाती घ्यावी, असेही आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोट
लंपी स्किन डिसीजबाबत जनजागृती करण्यासाठी पशुपालकांना माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्यात कुठेही लंपी स्किन डिसीज सदृश आजार नाही. तरीही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
डॉ. विजय राहाटे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
जिल्हा परिषद