आल्हाद काळे ठरला ‘रायसोनी व्हॉईस आॅफ अमरावती’
By admin | Published: December 26, 2015 12:18 AM2015-12-26T00:18:11+5:302015-12-26T00:18:11+5:30
युवकांना दिशा देणारे एक सशक्त व्यासपीठ लोकमत युवा नेक्स्ट व शैक्षणिक क्षेत्रात योग्य करिअर घडविण्यासाठी ...
अंतिम फेरी जल्लोषात : लोकमत युवा नेक्स्ट, रायसोनी ग्रुपचा उपक्रम
अमरावती : युवकांना दिशा देणारे एक सशक्त व्यासपीठ लोकमत युवा नेक्स्ट व शैक्षणिक क्षेत्रात योग्य करिअर घडविण्यासाठी कटिबध्द असलेल्या रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन (सिनिअर व ज्युनिअर) युवक-युवतींसाठी भव्य गायन स्पर्धा घेण्यात आली. ‘व्हॉईस आॅफ अमरावती’ या शीर्षकांतर्गत बुधवारी ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेची प्राथमिक फेरी २१ डिसेंबर रोजी टाऊन हॉल येथे पार पडली. यामध्ये २२ स्पर्धकांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. स्पर्धेची अंतिम फेरी २३ डिसेंबर रोेजी स्थानिक केशवराव भोसले सभागृहात अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जवलन करून करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी तरूण-तरूणींनी एकापेक्षा एक सरस हिंदी व मराठी गीते सादर केलीत. उपस्थित श्रोेत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. स्पर्धेत दर्यापूरचा आल्हाद काळे याने ‘सूर निरागस हो..’ हे गाणे दमदार पध्दतीने सादर करून स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावला तर प्रणय चक्रवर्ती याने प्रसिध्द पार्श्वगायक कैलास खेर यांचे ‘सैय्या..’ हे गीत अनोख्या पध्दतीने सादर केले. त्याला स्पर्धेचा द्वितीय विजेता घोषित करण्यात आले. तर प्रज्ज्वल खंडारे याने अग्निपथ चित्रपटातील गाजलेले ‘अभी मुझमे कहीं बाकी थोडी..’ हे गीत सादर केले. त्याला तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला.
तृतीय क्रमांकाचा विजेता घोषित करण्याकरिता परीक्षकांची तारांबळ झाली. प्रज्ज्वल खंडारे आणि अस्मिता काळे यांच्यामध्ये ‘टाय’ झाल्याने दोघांनाही आणखी एक-एक गाणे सादर करण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये प्रज्ज्वल खंडारे विजेता ठरला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आलीत. स्पर्धेत गायकांना वीरेंद्र गावंडे यांनी आॅक्टोेपॅडवर, रामेश्वर काळे की-पॅड, विशाल पांडे ढोलकी तर मनीष पाटील यांनी गिटारवर उत्कृष्ट साथसंगत दिली.
स्पर्धेला तरूण-तरूणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची रंगत कुंदा पुसदकर व नयन बोकाडे यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने अधिकच वाढली होती. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिध्द पार्श्वगायक गुणवंत डहाणे, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या रोशनी दर्जी यांनी केले. या कार्यक्रमात रायसोनी ग्रुपचे हेमंत सोनारे, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत इंगोले, उपप्राचार्य नितीन मांडवगडे, रायसोनी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रवीण वानखडे, रायसोनी मॅनेजमेंट कॉलेजच्या प्राचार्य, पल्लवी मांडवगडे, नगरसेविका अर्चना इंगोले. विशेष सहकार्य रायसोनीचे रवींद्र चव्हाण, मंगेश निचत, 'लोेकमत'चे रवी खांडे, जयंत कौलगिकर, स्वाती बडगुजर, शीतल चौहान आदींची उपस्थिती होती. स्पर्धेचे रसाळ व ओघवते संचालन करून पवन नालट यांनी दर्शकांना खिळवून ठेवले. संचालनादरम्यान केलेली कविता, चारोळ्या आणि शेरो-शायरीची बेमालूम पेरणी करून त्यांनीही संचालनादरम्यान टाळ्या घेतल्या. (प्रतिनिधी)