घरकुलाच्या वादातून मायलेकीसह चौघे जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:26 AM2018-05-18T01:26:37+5:302018-05-18T01:26:37+5:30
घरकुलाच्या वादातून मायलेकीसह चौघे जळाल्याची घटना अकोट रोडवरील कारला नजिकच्या काळगव्हाण येथे घडली. शशीकला वासुदेव कोरडे या वृद्ध महिलेच्या घराशेजारी वास्तव्यास असणारी त्यांची विधवा मुलगी शीला विकास सदार (४७) , मंदा दीपक देशमुख (४२) व कुलदीप दीपक देशमुख (२२) हे एकत्र राहणारे कुटुंब गुरुवारी सकाळी गंभीररित्या भाजले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : घरकुलाच्या वादातून मायलेकीसह चौघे जळाल्याची घटना अकोट रोडवरील कारला नजिकच्या काळगव्हाण येथे घडली. शशीकला वासुदेव कोरडे या वृद्ध महिलेच्या घराशेजारी वास्तव्यास असणारी त्यांची विधवा मुलगी शीला विकास सदार (४७) , मंदा दीपक देशमुख (४२) व कुलदीप दीपक देशमुख (२२) हे एकत्र राहणारे कुटुंब गुरुवारी सकाळी गंभीररित्या भाजले. जखमींपैकी मंदा देशमुख यांची प्रकृती गंभीर आहे. त्या सर्वांवर अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. इतर दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
शशीकला वासुदेव कोरडे यांच्या दोन्ही मुली त्यांच्याजवळ राहतात. शिला सदार या विधवा असून गावातच त्यांच्या घरकुलाचे काम सुरु आहे. आईच्या शेजारी राहणाऱ्या शिला सदार यांच्या घरी स्वयंपाक करताना ही घटना घडली. मंदा देशमुख या सुद्धा कौटुंबिक कारणामुळे मुलगा कुलदीपसह आई शशिकला यांच्याजवळ राहतात. मंदा देशमुख जळाल्या व त्यांची आरडाओरड ऐकून त्यांच्या आई व बहिणीसह कुलदीप त्यांना विझविण्यासाठी गेला. त्यातून ही घटना घडली. असे रहिमापूर पोलिसांनी सांगितले.
चौघांनाही अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले. यावेळी पोलिसांनी त्यांचे बयाण घेतले.
९० टक्के जळालेल्या शिला विकास सदार यांनी दिलेल्या बयाणानुसार, त्यांची बहिण मंदाचा मुलगा कुलदीपने तुला घरकुल मिळाले आहे. तू येथून निघून जा, असे शशीकला सदार यांना बजावले आणि अचानक त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला जावून कुलदीपने आपल्या अंगावर रॉकेल टाकून आपल्याला पेटवून दिले.असे बयान शीला यांनी दिले. शीला जळत असल्याचे पाहताच मंदा देशमुख यांनी त्यांना विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यादेखील ९० टक्के जळाल्या. या दोघींना वाचविण्यासाठी आई शशीकला कोरडे यादेखील धावत आल्या. आगीत त्या ५० टक्के भाजल्या तर दीपक देशमुख हा देखील ४० टक्के भाजला आहे. मंदा देशमुख यांनी पोलिसांना बयाण देण्यास नकार दिला तर शशीकला कोरडे यांनी त्या जळत असल्याचे पाहून मदतीला गेल्याचे आणि या घटनाक्रमातील काहीही माहिती नसल्याचे सांगितले.