कशी बजावणार नोटीस? बजावणारा अन् घेणाराही कर्मचारी संपात
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 18, 2023 06:18 PM2023-03-18T18:18:31+5:302023-03-18T18:21:16+5:30
जुनी पेन्शन योजना : प्रशासनासमोर पेच, आता व्हॅाटस अॅप, मेलचा आधार
अमरावती : पाच दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचारीसंपाने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, या आशयाची नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व विभागप्रमुखांना दिले आहे. किंबहुना याविषयी १३ मार्चला शासनाचे परिपत्रक आहे. मात्र, नोटीस बजावणारा व घेणारा, यासोबतच सर्व कर्मचारीसंपात असल्याने नोटीस बजावणार कशी, हा पेच विभाग प्रमुखांसमोर निर्माण झाला आहे.
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी व शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहे. त्यामुळे त्यांची दरदिवशी रजा विनावेतन होत आहे. या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, याविषयीची नोटीस बजावण्यात येणार आहे.
यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी सर्व विभागप्रमुखांना पत्र दिले आहे. मात्र, बहुतांश विभागप्रमुखांनी ही नोटीस बजावली नसल्याची माहिती आहे. सर्व कर्मचारी संपात असल्याने नोटीस कशी बजावावी, हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे नोटीस कर्मचारी सूचना फलक किंवा त्यांचे व्हॉट्सॲप, मेल किंवा त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.