धामणगावात सव्वा तीनशे फुटांचा तिरंगा, सीएए समर्थनार्थ रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 07:32 PM2020-01-04T19:32:00+5:302020-01-04T19:32:10+5:30
धामणगावात आगामी काळात या कायद्यासंदर्भात चर्चासत्र घेणार असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले.
धामणगाव रेल्वे (अमरावती) : ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘वुई सपोर्ट सीएए’, ‘जय श्रीराम’, ‘इंडिया वाँट्स सीएए’ अशा घोषणा देत शनिवारी तालुक्यातील शेकडो नागरिक, युवक, महिला, विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे समर्थन केले. सव्वा तीनशे फुटांच्या तिरंग्याने सर्वांचे लक्ष वेधले.
केंद्र शासनाने पारित केलेल्या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ लोकाधिकार मंच व विविध सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्षांच्यावतीने स्थानिक शिवाजी महाराज चौकातून ही रॅली काढण्यात आली. टिळक चौक, सिनेमा चौक, मेन लाइन, कॉटन मार्केट चौक, अमर शहीद भगतसिंग चौक या मार्गाने भ्रमण करीत भगतसिंग चौक येथे समारोप करण्यात आला. या रॅलीत तिरंगा, भगवा झेंडा हाती घेतलेल्या नागरिकांनी कायद्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
धामणगावात आगामी काळात या कायद्यासंदर्भात चर्चासत्र घेणार असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. राष्ट्रहिताच्या कायद्याविषयी काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून देशातील शांतता आणि एकात्मतेला धोका निर्माण करीत आहेत. अशावेळी या कायद्याविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी भारत सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समर्थन करणे महत्त्वाचे असल्याचे मत आमदार अरुणअडसड यांनी मांडले. शहरातून प्रथमच ही विशाल रॅली काढण्यात आली.
सव्वा तीनशे फुटांचा तिरंगा महिला, विद्यार्थी, युवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने धरला होता. भारतमातेची वेशभूषा राधा शर्मा हिने साकारली. विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री सागर खेडकर, अशोक शर्मा, श्रीराम पत्रे, विशाल गांधी उपस्थित होते.