न्यायासनावर सर्वांचाच विश्वास

By admin | Published: September 19, 2016 12:08 AM2016-09-19T00:08:18+5:302016-09-19T00:08:18+5:30

प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यासंबंधी ग्रामीण पोलिसांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना अभय दिल्याची भावना सामान्यजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे;..

All trust in judges | न्यायासनावर सर्वांचाच विश्वास

न्यायासनावर सर्वांचाच विश्वास

Next

तक्रारी बेदखल : कार्याध्यक्षांवर लागलेले आरोप गंभीर
अमरावती : प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यासंबंधी ग्रामीण पोलिसांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना अभय दिल्याची भावना सामान्यजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे; तथापि आश्रम पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती करणारा अर्ज आता न्यायासनासमोर असल्यामुळे तपास दडपला जाणार नाही, असा विश्वास सामान्यजन मोठ्या प्रमाणात व्यक्त करू लागले आहेत.
मुद्दा संवेदनशील आणि निरागस मुलांवर झालेल्या नरबळी हल्ल्याशी संबंधित असल्यामुळे व्यापक लोकभावना यांसंबंधीच्या घडामोडींशी जुळलेल्या आहेत. आश्रम पदाधिकाऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आश्चर्य वाटावे, असा लोकरेटा उभा ठाकला. त्यात सातत्य होते. धामणगाव, चांदूररेल्वे, अंजनसिंगी, कडकडीत बंद होते. अमरावतीत महामोर्चा निघाला, अमरावतीहून थेट आश्रमावर मार्च नेण्यात आला. नागपुरातील संविधान चौकात धरणे दिले गेले. साऱ्यांची मागणी एकच होती- शंकर महाराज, ट्रस्टीवर गुन्हे नोंदवा, प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, नरबळी प्रकरण मुळापासून खणून काढा, ज्यांना शक्य होते, ते रस्त्यावर उतरले. परंतु रस्त्यावर न उतरलेले नि याच मागण्यांशी सहमत असलेले हजारो लोक घराघरांत आहेत. मातृत्त्वाचा घात झाल्यामुळे महिलांच्या भावना या प्रकरणाशी विशेषत्त्वाने जुळल्या आहेत. सामान्य लोकांच्या पत्रांमधून त्यांच्या भावनांची तीव्रता स्पष्ट होते.
धामणगावचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन.आर.इंदरकर यांच्या न्यायालयात संजय वानखडे या अमरावतीच्या वकिलाने स्वत:हून दाखल केलेला अर्ज, हादेखील 'कॉमन मॅन' जागा झाल्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. क्वचितच प्रकरणी कुणी न्यायासनाकडे धाव घेऊन पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी आर्जव करतात. तपास यंत्रणा गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याची शंका उत्पन्न झाल्यामुळे न्यायासनाकडे धाव घेण्यात आली आहे. समाजातून अंधश्रद्धा आणि त्यामुळे समान्यांचे जीवहानीच्या प्रकारांचे समुळ उच्चाटण व्हावे, यासाठी आग्रह धरणाऱ्या सामान्यजनांचा न्यायालयांवर विश्वास किती गाढा आहे, हे यातून अधोरेखित होते.
घराघरांत, चौकाचौकांत चर्चिले जाणारे, अनेक गुढ मुद्यांबाबत सामान्यजनांची उत्सुकता चाळवणारे हे प्रकरण आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या अत्यंत बेकायदा वागणुकीमुळे अधिकच संशय उत्पन्न करणारे ठरले आहे. चौधरी यांच्याकडून प्रथमेशचा घात आजही होऊ शकतो, अशी तक्रार, त्याच्या आप्तेष्टांनी पोलिसांकडे केली आहे. मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याच्याकडूनही पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे. गुन्हा कबूल करायला लावणाऱ्यांत, शिवाय बाहेर काढू, असे सांगणाऱ्यांत शिरीष चौधरींचे नाव त्याने घेतले आहे.
चौधरी हे कार्याध्यक्ष असताना त्यांच्या आश्रमात नरबळीच्या प्रयत्नांचे गुन्हे घडणे, चौधरींनी त्याबाबतची माहिती लपविणे, अजयच्या आईला खोटी माहिती देणे, प्रकरण उघड झाल्यावर गुन्हेगार म्हणून ज्यांची नावे पोलिसांना दिली त्यातील मुख्य गुन्हेगारानेच चौधरींचे नाव घेणे, प्रथमेशच्या नातेवाईकांनी चौधरींविरुद्ध घातपाताच्या योजनेची तक्रार नोंदविणे, या घटना आंतर्संबंध दर्शविणारी साखळी निर्माण करतात. त्यांचा संबंध थेट आश्रम ट्रस्टच्या कार्याध्यक्षांशी असल्याने आश्रमाविरुद्धचा समान्यांचा संशय सकारण असल्याचे म्हणता येते. कायदे सर्वांसाठीच सारखे आहेत. पोलिस त्यांचा अंमल भलेही आपपर भावाने करतील; न्यायालये मात्र गुन्हे लपू न देण्याचे नि अन्याय दंडित करण्याचे कर्तव्य चोखपणे बजावतातच.

Web Title: All trust in judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.