आमच्यावरील आरोप खोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:24+5:302021-03-24T04:13:24+5:30
------------- तृतीयपंथीयांचे बडनेरा पोलिसांना निवेदन बडनेरा : काही तरुणांनी खोटे आरोप करून खऱ्या तृतीयपंथीयांविरोधात गुन्हे दाखल केले. बनावट तृतीयपंथी ...
-------------
तृतीयपंथीयांचे बडनेरा पोलिसांना निवेदन
बडनेरा : काही तरुणांनी खोटे आरोप करून खऱ्या तृतीयपंथीयांविरोधात गुन्हे दाखल केले. बनावट तृतीयपंथी म्हणून शहरात राजरोस फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी तृतीयपंथीयांनी मंगळवारी बडनेरा पोलीस ठाण्यात निवेदनातून केली.
एक वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे तृतीयपंथीय प्रचंड त्रस्त आहेत. आमची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. दैनंदिन खर्च कसा वहन करावा, या विवंचनेत सापडलो आहोत. कसेबसे पैसे मिळवून आम्ही आमचा खर्च भागवत असतो. अशातच शहरात मोठ्या प्रमाणात बनावट तृतीयपंथीयांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यामुळे आमच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. खरे व बनावट तृतीयपंथीयांमधील फरक लोकांच्या लक्षात यावा एवढाच नुकत्याच झालेल्या वादामागील हेतु होता. त्यामुळे खोटे आरोप हटविण्यात यावे, असा मजकूर तृतीयपंथीयांनी मंगळवारी बडनेरा पोलीस ठाण्याला सोपविलेल्या निवेदनात आहे. यावेळी मोठ्या संख्येत तृतीयपंथी उपस्थित होते.
---------------
घटना अशी होती
तृतीयपंथीयांनी दोन तरुणांना नग्न करून डोक्याचे केस कापल्याची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात १८ मार्च रोजी करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. तथापि, मंगळवारच्या घडामोडीने असली-नकलीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
""""""""""""""""""""""
प्रतिक्रिया
तृतीयपंथीयांविरोधात खोट्या तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यात आल्या. त्यांना हुडकून कारवाई करा, एवढेच पोलिसांना आमचे म्हणणे आहे.
- गुड्डी ऊर्फ रेखा पाटील, तृतीयपंथीयांची गुरू
"""""""''''''''''''''""""""""""''
काही तृतीयपंथीय बडनेरा पोलीस ठाण्यात आले होते. काही मागण्या त्यांनी निवेदनात नोंदविल्या आहेत.
- संजय आत्राम, उपनिरीक्षक, बडनेरा
--------------
फोटो मनीष भाऊं कडून घेणे