आरोप करण्यापूर्वी भाजपाने अभ्यास करावा
By admin | Published: June 13, 2017 12:10 AM2017-06-13T00:10:28+5:302017-06-13T00:10:28+5:30
ध्या भाजपमध्ये आमदार बच्चू कडू यांचेवर आरोपी करण्याची चढाओढ लागली आहे.
कडूंचा बचाव : बेलोऱ्याचे सरपंच सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : सध्या भाजपमध्ये आमदार बच्चू कडू यांचेवर आरोपी करण्याची चढाओढ लागली आहे. हे स्पष्टपणे जाणवत आहे. ९ जूनला आ. बच्चू कडू यांच्याविरोधात घेण्यात आलेली निषेध सभा ही याचेच फलित आहे. मात्र, बच्चू कडूंवर आरोप करण्यापूर्वी त्या भागातील माहिती मिळवायला हवी होती, असा प्रत्यारोप भाजपा नेत्यांवर बेलोराचे सरपंच स्वप्निल विधाते यांनी केला आहे. याबाबत त्यांनी निवेदनही दिले आहे.
बेलोरा गावात पाणीटंचाई असल्याचा बिनबुडाचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला. या आरोपात कोणतेही तथ्य नाही. त्यांच्याच प्रयत्नाने आज बेलोरा गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळते आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने आमदारांवर असे बेजबाबदार आरोप करणे योग्य नाही. त्यामुळे बेलोरा येथील पाणीटंचाईवर हे लेखी स्पष्टीकरण द्यावे लागत आहे, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
बेलोरा गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार, पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्ध योजना पुरस्कार देण्यात आले आहे. हे सर्व आ. कडू यांच्या अथक प्रयत्नाने साध्य झाले आहे. तसेच कार्यक्षम लोकप्रतिनिधींचा ‘आर्य चाणक्य पुरस्कार’ही आ. कडू यांना मिळाला आहे. त्याप्रमाणे "लोकमत"ने त्यांना ‘महाराष्ट्रीयन आॅफ द ईयर’ व सर्वात जास्त काम करणारा आमदार या श्रेणीतील पुरस्कारसुद्धा बच्चू कडू यांनाच प्रदान केला आहे. काम करण्याची एवढी जिद्द व दूरदृष्टी जिल्ह्यातील एकाही भाजप नेत्यामध्ये नाही, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.