डीएचओंविरुद्ध विनयभंगाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:14 PM2019-03-18T23:14:19+5:302019-03-18T23:14:39+5:30
चांदूरबाजार तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेने जिल्हा आरोेग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह तिघांनी विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी १७ मार्च रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत फुके, फार्मासिस्ट राजेंद्र राठी व एका महिलेविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ अ, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल के ला. तक्रारीमुळे जिल्हा परिषद व आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेने जिल्हा आरोेग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह तिघांनी विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी १७ मार्च रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत फुके, फार्मासिस्ट राजेंद्र राठी व एका महिलेविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ अ, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल के ला. तक्रारीमुळे जिल्हा परिषद व आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रानुसार, तक्रारकर्ती पीडिता चांदूरबाजार तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून तीन आठवड्यापूर्वी रुजू झाल्या. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी तासभर सहवासाची मागणी केली. तर ९ मार्च रोजी फार्मासिस्ट असलेल्या राजेंद्र राठी याने वाईट उद्देशाने बोलून विनयभंग केला. डॉ. हेमंत फुके याने आपल्याला डॉ. आसोलेंची सहवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी वारंवार त्रास दिला. तर तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत महिलेने डॉ. आसोले, डॉ. फुके व राजेंद्र राठी यांच्याशी संगनमत करून आपल्याला वारंवार त्रास दिला. तसेच घडलेल्या प्रसंगाची वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली. हा संपुर्ण घटनाक्रम २२ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी असलेल्या त्या महिलेने तेथे हैदोस घातला होता. तेथील कर्मचारी त्यांच्या दहशतीत होते. वस्तुस्थिती जाणल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्या वादग्रस्त आहेत. कार्यमुक्त केले म्हणून त्यांनी खोटी तक्रार नोंदविली.
- डॉ. सुरेश आसोले,
जिल्हा आरोग्य अधिकारी
महिलेने वैद्यकीय सेवेतील चार जणांविरुद्ध आरोप केले आहेत. त्यामुळे घटनेची सत्यता पडताळून पाहावी लागेल. चौकशीत तथ्य आढळून आल्यास आरोपींना अटक करा, असे निर्देश अधिनस्थ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- दिलीप झळके
पोलीस अधीक्षक
‘ती’ डॉक्टर पेट्रोलची बॉटल घेऊन पोहोचली एसपी कार्यालयात
आरोपींना अटक करण्याची मागणी
अमरावती : विनयभंग प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांचे निलंबन करा, मला न्याय द्या, नाही तर मी पेट्रोल अंगावर घेऊन स्वत:ला पेटवून देईन, असा टाहो सोमवारी एका पीडित महिला डॉक्टरने पोलीस अधीक्षक कार्यालयात फोडला. ती महिला पेट्रोलची बॉटल हाती घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा इशारा देत असल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक दिलीप झळके कक्षात उपस्थित नसल्यामुळे इतर अधिकाऱ्यांनी पीडिताची बाजू ऐकून तिला शांत करण्याचा, कक्षाबाहेर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्याय मिळेपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा त्या महिलेने घेतला होता.
पीडित महिलेने रविवारी दुपारी चांदूरबाजार पोलिसांत जिल्हा आरोग्य अधिकाºयासह चौघांविरुद्ध तक्रार नोंदविली. विनयभंग व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक का केली नाही, त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करा, त्यांचे निलंबन करा, अशी मागणी घेऊन ती पीडित महिला सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचली. पोलीस अधीक्षकांना यांना भेटण्यासाठी कक्षात जात असतानाच तिला उपस्थित अधिकारी-कर्मचाºयांनी रोखले. दरम्यान, त्या महिलेने आक्रमक पवित्रा घेऊन जवळ असलेली पेट्रोलने भरलेली बॉटल बाहेर काढली. यामुळे पोलिसांची ताराबंळ उडाली होती. काही महिला पोलिसांनी त्या महिलेजवळील पेट्रोल बॉटल हिसकावण्याचा प्रयत्न सुरू केला. झटापटीनंतर पोलिसांनी महिलेच्या हातातील बॉटल मिळविली. त्यानंतरही ती पीडित महिलेने मागणी रेटून धरल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. पोलिसांनी पीडित महिलेला कसेबसे आवरत शांत केले. त्यानंतर पीडित महिलेने माध्यमांशी संवाद साधून तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला.