राज्यात 30 हजार शाळांना एक लाख फुटबॉलचे होणार वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 05:06 PM2017-08-30T17:06:22+5:302017-08-30T17:06:22+5:30
‘फिफा’ फुटबॉल वर्ल्ड कप जनजागृती : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा पुढाकार
गणेश वासनिक/अमरावती, दि. 30 - देशात पहिल्यांदाच १७ वर्षे वयोगटातील फिफा फुटबॉल वर्ल्ड कप सामन्याचे आयोजन ६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्याचा क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने फुटबॉल खेळाचे वातावरण आणि आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ३० हजार शाळांमध्ये एक लाख फुटबॉल वाटप केले जाणार आहे. त्याकरिता शाळांना १० सप्टेंबर २०१७ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावयाची असून प्रत्येक शाळेला तीन फुटबॉल मिळणार आहे.
‘फिफा’ फुटबॉल वर्ल्ड कपचे सामने गुवाहाटी, कोलकाता, दिल्ली व मुंबई येथे होणार आहेत. आतापर्यंत ‘फिफा’ फुटबॉल स्पर्धेकरिता २४ देशांच्या चमूंनी नोंदणी केली असून ते सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. केंद्र सरकारने ‘फिफा’ वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुठल्याही उणिवा राहू नये, यासाठी युद्धस्तरावर बैठकांचे सत्र चालविले आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने फुटबॉल खेळाचे महत्त्व, आवड आणि वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी गाव, खेड्यांत प्रचार व प्रसार होण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
पहिल्या टप्प्यात ३० हजार शाळांना फुटबॉल वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यानंतर विधानसभा मतदार संघनिहाय तालुकास्तरावर आमदार फुटबॉल चषक सामन्यांचे आयोजनदेखील करण्यात येईल. या स्पर्धा आयोजनासाठी पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे निधी वितरित केले जाणार आहे. राज्यातील प्रत्येक शहर, गाव, खेड्यात सप्टेंबर महिन्यात फुटबॉलमय वातावरण निर्माण व्हावे, यासाठी एक मिलियन फुटबॉल उत्सव हा उपक्रम राबविला जाणार आहे.
देशभरात १५ सप्टेंबर रोजी फुटबॉल खेळल्या जाणार
‘फिफा’ फुटबॉल वर्ल्ड कप जनजागृतीसाठी देशभरात १५ सप्टेंबरला एकाच दिवशी ठिकठिकाणी फुटबॉल खेळाचे आयोजन केले जाणार आहे. फुटबॉल खेळाची आवड असलेल्या प्रत्येकांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यानुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तयारी चालविली आहे.
‘फिफा’ फुटबॉल वर्ल्ड कप आयोजनाच्या पार्श्वभूमिवर फुटबॉल खेळाचे जनजागृतीसाठी विविध क्रीडा उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक शाळेला तीन फुटबॉल वाटपानुसार जिल्ह्यात ६५० शाळांना सुमारे २० हजार फुटबॉल वाटपाचे नियोजन आहे.- गणेश जाधव,जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती