विद्यापीठात आभासी दीक्षांत समारंभाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:03+5:302021-05-27T04:13:03+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन होणार आहे. ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन होणार आहे. त्याअनुषंगाने विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी दीक्षांत समारंभाच्या तयारीत मग्न असून, विद्यापीठात लगबग सुरु झाली आहे.
दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भूषवतील तर, केंद्रीय भूपृष्ठ दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे दीक्षांत भाषण करतील. विशेष अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत हे राहतील. स्वागतपर, प्रस्ताविक कुलगुरू मुरलीधर चांदेकर हे करतील. प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दीक्षांत समारंभासाठी मान्यवरांसह कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक, अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सिनेट सदस्य, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी आदी ऑनलाईन राहणार आहेत. विद्यापीठातून २७१ आचार्य पदवीधारकांना पदवी वितरण केली जाणार आहे. अन्य शाखेच्या पदवी महाविद्यालयातून देण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------------
विद्याशाखानिहाय आचार्य पदवीचे होणार वितरण
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा- १२६
मानव विज्ञान विद्याशाखा- ८७
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा- १९
आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा- ५२
-----------
कोट
दीक्षांत समारंभाच्या आयोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. समारंभाचे अध्यक्ष, अतिथी, पाहुणे हे ऑनलाईन उपस्थित असतील. आभासी समारंभाची स्वतंत्र लिंक दिली जाणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ