वाचनासोबत स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करताना नियोजनही महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:16 AM2021-08-13T04:16:26+5:302021-08-13T04:16:26+5:30
मगन मेहते, डॉ.अब्दुल कलाम अभ्यासिकेचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चांदूर रेल्वे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पुस्तक वाचनासोबत अभ्यासाचे नियोजनही तेवढेच ...
मगन मेहते, डॉ.अब्दुल कलाम अभ्यासिकेचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
चांदूर रेल्वे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पुस्तक वाचनासोबत अभ्यासाचे नियोजनही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते यांनी केले. ते स्थानिक पोलीस ठाण्यातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेत रविवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आगामी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने सदर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गावातच अभ्यासिका उपलब्ध व्हावी, या दृष्टीने ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावरील पोलीस ठाण्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने अभ्यासिका सुरू केले असुन, याला चांदूर रेल्वेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच ठाणेदार मगन मेहते यांनी सदर अभ्यासिकेत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रविवारी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, हल्ली शिक्षणाची गंगा खेडोपाडी वाहत आहे. शिक्षणाची संधी सहजगत्या उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात सामिल झाले. प्रवाहाचा घटक बनले. आज विविध क्षेत्रामध्ये मुलांसोबत मुली सुध्दा चमकदार कामगिरी करीत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. अशातच कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना सर्वात मोठे आव्हान आपली इच्छाशक्ती असते. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचन नव्हे, तर स्पर्धा परीक्षा देताना अभ्यासाचे योग्य नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. स्मार्ट वर्क करा. अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न सोडू नका. एक ना एक दिवस यश नक्कीच मिळेल. निसटलेल्या यशामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभे राहून कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण असतील तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे अवघड नाही, असे मत ठाणेदार मगन मेहते यांनी व्यक्त केले. यावेळी पोलीस जमादार शिवाजी घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस ठाण्यातील अभ्यासीकेतील विद्यार्थी उपस्थित होते.