जुळ्यांना वाचविण्यासाठी हवी सहृदांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:33 AM2019-07-12T01:33:21+5:302019-07-12T01:34:01+5:30
अॅनिमिया या आजाराने ग्रस्त कुठल्याही बालकाला वाचविण्यासाठी बोनमॅरो प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया आवश्यक असते. अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या एका आठ वर्षीय अॅनिमियाग्रस्त मुलाला त्याच्या जुळ्या भावाच्या शरीरातील बोनमॅरो प्रत्यारोपित केले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अॅनिमिया या आजाराने ग्रस्त कुठल्याही बालकाला वाचविण्यासाठी बोनमॅरो प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया आवश्यक असते. अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या एका आठ वर्षीय अॅनिमियाग्रस्त मुलाला त्याच्या जुळ्या भावाच्या शरीरातील बोनमॅरो प्रत्यारोपित केले जाणार आहेत. मात्र, त्यासाठी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जुळ्यांची ही जोडी दीर्घायुषी होण्यासाठी सहृद अमरावतीकरांनी भरभरून मदतीचा हात देणे आवश्यक आहे.
आदेश संदीप शेरेकर हा आठ वर्षीय मुलगा अपलास्टिक अॅनिमिया (थॅलेसिमिया) या आजाराने ग्रस्त आहे. आवश्यक घटकांअभावी शरीरात रक्त तयार होत नसल्याने त्याला वारंवार रक्त द्यावे लागत आहे. त्यावर रक्तसंबंधातील भावाकडून बोनमॅरो प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया हाच इलाज आहे. दरम्यान, या आजाराने अत्यवस्थ स्थितीला पोहोचलेला आदेश मुंबई येथील एमसीजीएम - काँप्रीहेन्सीव्ह थॅलेसिमिया केअर, पेडियाट्रिक हिमॅटोलॉजी - आॅन्कॉलॉजी अँड बीएमटी सेंटर या रुग्णालयात दीड महिन्यांपासून दाखल आहे. पुढील आठवड्यात गुरुवारी त्याच्यावर बोनमॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सुचविले आहे. त्याचा जुळा भाऊ संदेश संदीप शेरेकर याच्या शरीरातील बोनमॅरो प्रत्यारोपित करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेचा खर्च १२ लाख रुपये आहे.
मदतीचे आवाहन
आदेशचे वडील संदीप शेरेकर यांची आर्थिक स्थिती साधारण आहे. शस्त्रक्रियेचा १२ लाखांचा खर्च झेपणारा नसल्याने सहृद अमरावतीकरांनी भरभरून मदत करावी, असे आवाहन आशिष मधुकर शेरेकर यांनी केले आहे.
येथे देता येईल मदत
संदीप मधुकर शेरेकर यांच्या आरबीएल बँकेच्या ३०९००७२८०५३९ क्रमांकाच्या खात्यात दानदात्यांना मदतराशी रोखीने वा धनादेशाद्वारे टाकता येईल. बँकेचा आयएफएससी कोड आरटीएन ०००१६२ आहे.