आधीच सिलिंडर हजाराच्या घरात, घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:54+5:302021-09-12T04:15:54+5:30
अमरावती जिल्ह्यात एच.पी., इंडेन आणि भारत कंपनीचे गॅस सिलिंडर वितरित होतात. याचे एकूण ग्राहक १२ लाखांवर आहेत. दर महिन्यात ...
अमरावती जिल्ह्यात एच.पी., इंडेन आणि भारत कंपनीचे गॅस सिलिंडर वितरित होतात. याचे एकूण ग्राहक १२ लाखांवर आहेत. दर महिन्यात २५ रुपयांनी सिलिंडरचे दर वाढत असल्याने वाढत्या महागाईत सामान्यांची सिलिंडर संपताच हजार रुपयांची तडजोड करताना मोठी दमछाक होत आहे. शासनाकडून यावर सबसिडी केवळ १६ रुपये दिली जाते. मात्र, डिलिव्हरी बॉय किमतीपेक्षा २० रुपये अतिरिक्त मागत असल्याने नाईलाजास्तव द्यावेच लागत असल्याच्या अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यापेक्षा टॅक्स कमी केल्यास किंमत आटोक्यात येऊन सामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक करीत आहे.
पॉइंटर
सध्या गॅस सिलिंडर दर - ९१० रुपये
जिल्ह्यात एकूण ग्राहक - १२ लाख
बॉक्स
डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?
सिलिंडरव्या वाढीव दराने आधीच बजेट कोलमडले आहे. त्यातही डिलिव्हरी बॉय अतिरिक्त २० रुपये आकारतात. मनाई केल्यास पुढील सिलिंडर कसे आणतील, याची भीती बाळगून नाइलाजास्तव मागेल तेवढे द्यावे लागते. मात्र, याची कुठलीही पावती दिली जात नाही.
- एक गृहिणी
सिलिंडर संपण्यापूर्वीच पदरमोड करून तेवढी रक्कम जमवण्यात कसरत होते. त्यातही डिलिव्हरी बॉयला अतिरिक्त २० रुपये न दिल्यास पुढचे सिलिंडर कमी तर नाही आणणार ना, अशी भीती मनात असते. डिलिव्हरी बॉयला पैसे द्यावे की नाही, याबाबत शासनाने स्पष्ट करावे.
- एक गृहिणी
वितरक काय म्हणतात?
सिलिंडर रिफिलिंगसाठी नंबर लावताना जसे मेसेज येते, तसेच एजन्सीतून सिलिंडरची उचल झाल्यानंतरही किती रुपये द्यायचे याबाबतचा मेसेज ग्राहकांच्या मोबाईलवर येतो. त्यामुळे अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. स्वखुशीने देत असतील तर त्याला आमचे किंवा कंपनीचे हरकत नाही.
- मोहम्मद हसनज, वितरक एच.पी. गॅस
--
आता सर्व डिजिटायझेशन झालेले आहे. त्यामुळे पैसे ऑनलाईन भरणा होत आहे. काही ग्राहक घरी सिलिंडर आल्यावर नगदी देत असतील त्यांनी मेसेजनुसारच द्यावे. डिलिव्हरी बॉयला सिलिंडर वितरणाचे मेहनताना वितरकाकडून देण्यात येते. आगाऊ पैशांची मागणी होत असेल तर वितरकांशी संपर्क साधता येईल.
- संजय देशमुख,
अध्यक्ष, गॅस डिलर्स असोसिएशन अमरावती